https://images.loksatta.com/2020/05/nsk05-2.jpg?w=830
ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामावर कार्यरत मजूर.

ग्रामीण भागांवरही बेरोजगारीचे संकट

‘मनरेगा’च्या कामावर अडीच पट जादा मजूर

by

‘मनरेगा’च्या कामावर अडीच पट जादा मजूर

अनिकेत साठे लोकसत्ता

नाशिक : करोनाकाळात शहराप्रमाणे ग्रामीण भागावरही बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. रोजगाराचे अन्य पर्याय बंद झाल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवर मजुरांची संख्या तब्बल अडीच पटीने वाढली आहे. गेल्या वर्षी नाशिक विभाग दुष्काळात होरपळला. तेव्हां मेच्या मध्यावर विभागात २८ हजार मजूर कामांवर कार्यरत होते. या वर्षी या संख्येने ७५ हजारचा टप्पा ओलांडला आहे. ग्रामीण भागात रोजगाराची नितांत गरज असून दिवाळीनंतर सलग सहा महिने मजुरांना काम मिळायला हवे, याकडे सामाजिक संस्था लक्ष वेधत आहेत.

टाळेबंदीत मजुरांचे जत्थे मिळेल त्या साधनाने अथवा पायी गावी परतले. शहरी, निमशहरी भागातील निर्बंधाने रोजगार हिरावला गेला. उन्हाळात ग्रामीण भागात शेतात फारशी कामे नसतात. द्राक्ष बागा वा तत्सम कामे असूनही ती करणे अशक्य बनले होते.

बराच काळ मजुरांना घरात बसून रहावे लागले. या सर्वाचा परिणाम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांची संख्या लक्षणियरित्या वाढण्यात झाल्याचे चित्र आहे. याची आकडेवारी विभागीय उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांनी दिली. गेल्या वर्षी १० मे रोजी पाच जिल्ह्य़ांत २८ हजार मजुरांना काम देण्यात आले होते. यंदा ही संख्या जवळपास ७६ हजार एवढी आहे. यात नाशिक जिल्ह्य़ात २०३४४, जळगाव ५४४१, नंदुरबार २८८००, धुळे ११०८० आणि अहमदनगर जिल्ह्य़ात १०३१० जणांचा समावेश आहे. मनरेगा अंतर्गत करावयाची ९८ हजार ८५१ कामे असून एक लाखापेक्षा अधिक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची तयारी आहे. विभागातील ५०७७ पैकी निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीत रोहयोची कामे सुरू केल्याचे डॉ. चिखले यांनी सांगितले. मनरेगा अंतर्गत जलसंधारण आणि गाळ काढण्याची अधिकाधिक कामे हाती घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सांगितले.

नाशिकच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी जिल्ह्य़ात मजुरांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याचे सांगितले. मागील वर्षी दुष्काळ असूनही जिल्ह्य़ात आठ हजार मजूर कामावर उपस्थित होते. यंदा हे प्रमाण २० ते २५ हजार मजुरांवर पोहचले आहे.

करोनामुळे सामाजिक अंतर राखून, मास्क परिधान करून मजूर कामावर हजर आहेत. मजुरांना एका दिवसासाठी २३८ रुपये मजुरी दिली जाते. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसांच्या आत सर्व मजुरांच्या खात्यावर मजुरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो, असा दावा प्रशासनाने केला. करोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ग्रामीण भागासाठी ही योजना उपयुक्त ठरत असून योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चिखले यांनी केले आहे.

रोजगार हमीची कामे दरवर्षी फेब्रुवारीत सुरू केली जातात. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक कामे असतात. यंदा ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव झाला असतानाही प्रारंभीची दोन महिने कामे काढलीच गेली नाहीत. त्यावेळी बहुतांश मजूर घरात बसून होते. आता कामांना सुरूवात झाली असून दरवर्षी पेक्षा चांगली स्थिती आहे. मात्र, पुढेही ती कायम राखावी लागेल. दिवाळीनंतर सलग सहा महिने मजुरांना काम मिळायला हवे. मजुरीची रक्कम आठ नव्हे, तर १५ दिवसांत मजुरांच्या बँक खात्यात जमा होत आहे.

– अश्विनी कुलकर्णी (प्रगती अभियान)

१३ हजारहून अधिक कामे

मनरेगा अंतर्गत वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल, मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटीका, फळबाग लागवड, वनीकरण आदी कामे केली जातात. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढून गावाला याचा उपयोग होणार आहे. सद्यस्थितीत वैयक्तिक स्वरुपाची ११ हजार ९७४, तर सार्वजनिक स्वरुपाची ११७७ कामे सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.