Coronavirus : ठाण्यातील १११ पोलीस करोनाबाधित
१४ अधिकारी, ९७ कर्मचाऱ्यांचा समावेश
by लोकसत्ता टीम१४ अधिकारी, ९७ कर्मचाऱ्यांचा समावेश
ठाणे : ठाणे पोलीस दलातही करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोडत असलेल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये सोमवापर्यंत १११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यात १४ अधिकारी आणि ९७ कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. यातील ६१ जणांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी येथील एकूण ३५ पोलीस ठाणी येतात. यासह गुन्हे अन्वेषण शाखा, मुख्यालय, विशेष शाखा, वाहतूक विभाग तसेच इतर काही विभाग येतात. करोनाच्या प्रादुर्भावानंतर टाळेबंदी लागू झाल्यापासून पोलिसांसमोर बंदोबस्त, कायदा, सुव्यवस्था राखण्यापासून ते मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पाठवण्यापर्यंतची आव्हाने सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे कर्तव्यावर दक्ष असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होऊ लागली आहे.
ठाणे पोलीस दलात सर्वप्रथम मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली. त्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यातही आरोपीच्या संपर्कात येऊन तीन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयातील ३५ पैकी १८ पोलीस ठाण्यांतील तसेच इतर विभागांतील १११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. यामध्ये ९७ हवालदार तसेच १४ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील ६१ जणांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित ४९ जणांची करोनातून मुक्तता झाली आहे. करोनाची लागण पोलीस दलात झाली असली तरीही करोना झालेल्यांच्या संपर्कात आलेले आणि विलगीकरण करण्यात आलेले ४६ पोलीस अधिकारी, २४८ पोलीस कॉन्स्टेबल असे २९४ जण विलगीकरणाचा काळ संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.