https://images.loksatta.com/2020/05/mv01-8.jpg?w=830

परिचारिकांबद्दल कुठे घृणा, कुठे कौतुक

खोली खाली करून इतरत्र व्यवस्था करावी, यासाठी परिचारिकांवर दबाव वाढू लागला.

by

मुंबई : करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांचा एकीकडे शेजाऱ्यांकडून मानसिक छळ के ला जात आहे, तर दुसरीकडे आजूबाजूच्या रहिवाशांकडून त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. हे विरोधाभासी चित्र ग्रॅण्ट रोड येथील जवळजवळ असलेल्या दोन इमारतींमध्ये पाहायला मिळत आहे.

दक्षिण मुंबईतील या नामांकित रुग्णालयातील परिचारिका मोठय़ा संख्येने ग्रँट रोड येथील इमारतींमध्ये(भाडेकरारावर) वास्तव्य करतात. या रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचारांची व्यवस्था करण्यात आल्यानंतर परिचारिका वास्तव्यास असलेल्या इमारतीतील रहिवासी बिथरले. खोली खाली करून इतरत्र व्यवस्था करावी, यासाठी परिचारिकांवर दबाव वाढू लागला.

लिफ्ट वापरू न देणे, घरात जमा झालेला कचरा बाहेरील कचराकुंडीत जमा करावा, येण्या-जाण्याच्या वेळांवर बंधने आदी निर्बंध लादून परिचारिकांना त्रास देण्याचे प्रयत्न के ले गेले. त्यानंतर परिचारिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रोर के ली. पोलीस, आरोग्य अधिकाऱ्यांनी इमारतीतील रहिवाशांची समजूतही घातली होती. त्यानंतर आता परिचारिकांचे किमान सामान घेण्याची मुभा द्यावी, आम्ही त्यांची व्यवस्था इतरत्र करत आहोत, अशी विनंती रुग्णालयाने दोनच दिवसांपूर्वी यातील एका गृहनिर्माण संस्थेकडे के ली आहे. याची प्रत लोकसत्ताकडे आहे. मात्र त्याबाबत रुग्णालय आणि गृहनिर्माण संस्था काहीही बोलण्यास तयार नाही.

परिचारिकांपैकी अश्विनी इंगळे या खंबाला हिल रुग्णालयात काम करतात. रविवारी त्यांनी इमारतीतील सर्वच रहिवाशांचे शरीरिक तापमान, शरीरातील ऑक्सिजन पातळी आणि अन्य प्राथमिक चाचणी के ली. प्रादुर्भाव वाढल्यापासून या परिचारिका नियमितपणे इमारतीतल्या रहिवाशांची चाचणी करतात, योग्य मार्गदर्शन करतात, अचूक सल्ला देतात, रुग्णालयात दाखल करून घेण्यात मोलाचे सहकार्य करतात, असे इथल्या रहिवाशांनी सांगितले.

रहिवाशांना परिचारिकांचा अभिमान

ग्रॅँट रोड येथील वेलेन्सीया नावाची इमारत आहे. तेथेही महापालिके च्या नायरसह खासगी रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या परिचारिका वास्तव्य करतात. मात्र या इमारतीतील रहिवाशांना परिचारिकांचा अभिमान आहे. गृहनिर्माण संस्थेने के लेल्या नियमांमधून या परिचारिकांना विशेष सवलत दिली जाते. त्या योद्ध्या आहेत. त्यांना स्वत:ची काळजी कशी घ्यायची हे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जास्त कळते. शिवाय आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये याचीही जाणीव त्यांच्यात जास्त आहे. त्यामुळे आमच्या इमारतीतील प्रत्येकाला त्यांचे कौतुक आहे, अशी प्रतिक्रि या संस्थेचे अध्यक्ष राणे यांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.