https://images.loksatta.com/2020/05/corona-1.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

शिरपूर तालुक्यात २४ तासांत करोनामुळे तिघांचा मृत्यू

जिल्हा रुग्णालयातील १३ अहवाल नकरात्मक

by

धुळे शहर पाठोपाठ शिरपूर तालुक्यात करोनाचा विळखा बसू लागला असून २४ तासात करोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी तीन रुग्णानंतर पाटीलवाडा भागात मंगळवारी एका पुरूषाचा अहवाल सकारात्मक आल्याने रूग्णसंख्याही वाढत आहे.

सोमवारी शिरपूर शहरातील तिघांचा अहवाल सकारात्मक आला. काझीनगर येथील वृध्दाचा बळी गेला. तालुक्यातील भाटपुरा येथील रूग्णाचाही करोनामुळे मृत्यू झाला. शनिवारी पाटीलवाडा भागात मृत्यू झालेल्या ५० वर्षांच्या महिलेचा अहवाल सकारात्मक आल्याने शहरात खळबळ उडाली.

जिल्हा रुग्णालयातील १३ अहवाल नकरात्मक आले आहेत. आतापर्यंत शिरपूर तालुक्यात १२ रुग्ण आढळले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक असून टाळेबंदीचे पालन करणे, शारीरिक अंतर राखणे, मास्क वापरणे, नियमित हात धुणे यावर भर देणे आवश्यक आहे.

शिरपूर शहरात करोनाचे रूग्ण आढळलेले भूपेश नगर, काझी नगर, अंबिकानगर, खालचे गाव बालाजी मंदिराजवळ, दारू मोहल्ला, मारवाडी गल्ली हे भाग प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या भागातील सर्व व्यवहार ३० मेपर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास कालावधी वाढविण्यात येऊ शकतो.

या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेकडून प्रभाग अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधावा. शहरातील इतर भागात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चालू राहतील. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन शिरपूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्य प्रदेश सिमेपर्यंत ४५ मजुरांना दोन बसगाडय़ांमधून मंगळवारी शिरपूर येथून रवाना करण्यात आले. आपल्या गावी जाण्याची सोय झाल्याने मजूर आणि त्यांच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले. शिरपूर शहराजवळ शनी मंदिरात परिसरात अरुणावती नदी पात्राजवळ अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील ४५ मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी पाठपुरावा करून सोय करण्यात आली. यासाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांनी तहसीलदार आबा महाजन आणि आगार व्यवस्थापिका वर्षां पावरा यांना कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवारी सकाळी नऊ वाजता सर्व ४५ मजुरांना वरला या मध्य प्रदेशच्या सिमेपर्यंत दोन बसमध्ये बसवून रवाना करण्यात आले. यावेळी आमदार काशीराम पावरा, तपनभाई पटेल, आगार व्यवस्थापक वर्षां पावरा, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी आणि श्री संताजी फ्रेंड्स सर्कल यांच्या वतीने मजुरांना फळ आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.