मुंबईत आतापर्यंत २,४२३ भारतीय परतले
वंदे भारत अभियानाअंतर्गत त्यांना भारतात परत आणण्यात येत आहे.
by लोकसत्ता टीममुंबई : परदेशांत अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘वंदे भारत अभियान’अंतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत १७ विमानांतून २,४२३ भारतीय नागरिक विदेशातून परतले आहेत. त्यापैकी ९०६ प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रातील १ हजार १३९ आणि इतर राज्यांतील ३७८ प्रवासी आहेत. ७ जूनपर्यंत आणखी १३ विमानांनी जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून भारतीय नागरिक परतणार आहेत.
करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. वंदे भारत अभियानाअंतर्गत त्यांना भारतात परत आणण्यात येत आहे. मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासनाने सर्व कार्यवाही आखली आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा या अभियानासाठी काम करीत आहेत.
विशेष विमानांनी परत येणाऱ्या नागरिकांचे खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जात आहे. इतर जिल्ह्यांतील व इतर राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. इतर राज्यांतील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्यांकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईत अलगीकरण व्यवस्थेमध्ये पाठवले जात आहे. वाहतूक परवाना संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येते.
मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरणाची सुविधा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित केले आहेत. परतलेल्या नागरिकांपैकी मुंबईतील विविध ४३ हॉटेल्समध्ये मिळून सुमारे १ हजार १२८ नागरिकांना अलगीकरण व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.
विमानतळावर आलेल्या प्रवाशांची विमानतळ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येते. त्यानंतर महसूल विभागनिहाय उपलब्ध असलेल्या टेबलवर जाऊन प्रवाशांना वाहतूक परवाना दिला जातो. हा परवाना घेऊन द्वार क्रमांक ४ येथे प्रवासी येतात. तेथून प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहने पुरवतात. तर बृहन्मुंबईतील नागरिकांना बेस्ट बसेस व एसटीच्या बसगाडय़ांमार्फत रवाना केले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.