https://images.loksatta.com/2020/05/corona-1-1.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

करोनाशी लढण्यासाठी ‘ऑक्सिजन आर्मी’

इलेक्ट्रिक यंत्राद्वारे अत्यवस्थ रुग्णांना प्राणवायू

by

इलेक्ट्रिक यंत्राद्वारे अत्यवस्थ रुग्णांना प्राणवायू; महापालिकेच्या के पूर्व विभागात १५ यंत्रे तयार

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : प्राणवायूची पातळी कमी होत गेल्यामुळे अत्यवस्थ झालेल्या करोना रुग्णांसाठी पालिकेच्या के पूर्व विभागाने ऑक्सिजनचा पुरवठा करणारी १५ यंत्रे तयार ठेवली आहेत. दुचाकीवरून रुग्णाच्या घरापर्यंत नेता येतील, अशा या यंत्रांमुळे अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व हा भाग असलेल्या पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुरुवातीच्या काळात फारसे रुग्ण नव्हते. मात्र, ७० टक्के झोपडपट्टी असलेला हा भाग गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर संक्रमित होऊ लागला असून रुग्णांची संख्या १३५० झाली आहे. विमानतळ आणि रुग्णालयात काम करणारा बराचसा कर्मचारी वर्ग हा याच भागात राहतो.

मुंबईत अनेकदा रुग्णवाहिका मिळत नाही, तर कधी खाटा उपलब्ध नसतात. त्यामुळे बाधित झालेला रुग्ण घरीच अत्यवस्थ झाल्याच्या घटनाही घडतात. अशा अत्यवस्थ रुग्णांना प्रथमोपचार म्हणून प्राणवायूचा पुरवठा करणारे यंत्र के पूर्व विभाग कार्यालयाने तैनात ठेवले आहे.

एखादा रुग्ण बाधित झाला की साधारणत: ते प्रथम नगरसेवकांकडे मदत मागतात. त्यामुळे के पूर्व विभागातील १५ नगरसेवकांना हे यंत्र देण्यात आले आहे. रुग्णवाहिका व खाट उपलब्ध होईपर्यंत रुग्ण घाबरून अत्यवस्थ होतात, तसेच करोना बाधित रुग्णांमध्ये प्राणवायूची पातळी झपाटय़ाने खाली जाते. अशा रुग्णांना या यंत्रामुळे मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पालिकेच्या विभाग कार्यालयातही दोन यंत्रे ठेवण्यात आली असून एखाद्या रुग्णाला गरज भासल्यास आरोग्य कर्मचाऱ्याबरोबर दुचाकीवरून हे यंत्र घरी पाठवून त्याला प्राणवायूचा उपचार देता येऊ शकेल. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाचा महत्त्वाचा कालावधी वाचवता येईल, असेही ते म्हणाले.

मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची प्राणवायू पातळी कमी झाली की ते लगेच गंभीर अवस्थेला जातात. अशावेळीही या यंत्राचा उपयोग होईल. या यंत्राने आतापर्यंत आम्ही एका रुग्णाला मदत केली आहे. कोणी रुग्ण घरीच अत्यवस्थ झाला की त्याच्या घरी हे यंत्र पाठवता येते. मात्र ज्याच्याबरोबर हे यंत्र पाठवतो. त्यालाही सावधगिरीच्या सूचना आणि स्वरंक्षणाचा वेष देऊन पाठवावे लागते, अशी माहिती विभागातील नगरसेवक अभिजीत सामंत यांनी दिली.

असे काम करते यंत्र

सहज उचलता येईल असे हे यंत्र विजेवर चालणारे असून ते हवेतून ऑक्सिजनचा पुरवठा करते. हवेतील नायट्रोजन किंवा अन्य विषारी वायू वगळून केवळ ऑक्सिजनचा सलग पुरवठा यामुळे होतो. या यंत्राला एक रबरी नळी जोडून ती रुग्णाच्या नाकाला लावली जाते. प्रत्येक रुग्णासाठी नवीन रबरी नळी पुरवली जाते.

प्राणवायू पुरेसा न मिळाल्यामुळे करोनाबाधित रुग्णाची प्रकृती ढासळत जाते, असे आढळून आले आहे. वेळीच त्याला प्राणवायूचा पुरवठा झाला तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे हे यंत्र आम्ही वापरत आहोत.

-प्रशांत सपकाळे, साहाय्यक आयुक्त, के पूर्व

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.