https://images.loksatta.com/2020/05/test-2.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

सामूहिक संसर्गाच्या तपासणीसाठी सांगलीसह आठ जिल्ह्य़ांत रक्तचाचणी

राष्ट्रीय आयुर्वज्ञिान संशोधन संस्थेतर्फे मोहीम

by

समाजामध्ये करोनाचा सामूहिक संसर्ग झाला आहे का याची राज्यातील आठ जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय आयुर्वज्ञिान संशोधन संस्थेच्यावतीने राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी आणि नांदेड या जिल्हयात ही तपासणी मोहीम राबविली जात आहे. यामध्ये या प्रत्येक जिल्हयातील विविध भागातील ४०० व्यक्तींचे रक्तनमुने घेत त्यांची चेन्नईच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. सांगलीत असे हे नमुने गोळा करत तपासणीसाठी आज पाठवण्यात आले. रक्तनमुन्यांच्या या तपासणी निष्कर्षांवर करोनाचा फैलाव कितपत झाला आहे हे समोर येणार आहे.

करोना संसर्ग ओळखण्यासाठी स्वॅबचे नमुने तपासणी करणे हाच सध्या पर्याय उपलब्ध आहे. मात्र यासाठी रूग्णामध्ये लक्षणे आढळणे महत्त्वाचे ठरत आहे. मात्र करोना संसर्ग झालेल्या ८० टक्के लोकांमध्ये याची लक्षणेच आढळून येत नाहीत. मात्र त्यांच्याकडून करोना प्रसार होऊ शकतो. ही बाब विचारात घेउन राष्ट्रीय आयुर्वज्ञिान संस्थेतर्फे ही मोहीम राबवण्यात येत आहे. सांगलीमध्ये राष्ट्रीय आयुर्वज्ञिान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. हृषीकेश आंधळकर आणि त्यांच्या १५ जणांच्या पथकाने नुकतीच अशी तपासणी मोहीम पूर्ण केली. यामध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुजाता जोशी यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स, परिचारिका यांच्या मदतीने जिल्हयातील ४०० जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी एकाच वेळी घेतले गेले. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांचे सहकार्य  लाभले. राज्यामध्ये मुंबई, पुणे या करोनाच्या अतिबाधित शहरासह सांगली, अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी आणि नांदेड या जिल्हयात वेगवेगळ्या गावातील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. सांगली जिल्हयातील नेल्रे, बागणी, कवठेपिरान, खेराडे वांगी, खरसुंडी आणि आरग या प्राथमिक आरोग्य केंद्र, आष्टा व माडग्याळ या ग्रामीण रूग्णालय क्षेत्रातील आणि महापालिकेच्या ९ व १८ या प्रभागातील प्रत्येकी ४० अशा ४०० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले.

वाहक रुग्णांचा अभ्यास होणार

हे रक्तनमुने चेन्नईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून या रक्तामधील रक्तपेशी आणि जलद्रव्य यांचे विलगीकरण करून करोना विषाणूंचे अस्तित्व आहे का याचे निरीक्षण केले जाणार आहे. या चाचणीमुळे समाजात करोना विषाणूचा प्रसार सामूहिक झाला आहे का याचा निष्कर्ष काढता येणार आहे. तसेच करोना विषाणूचे वाहक रुग्ण असणाऱ्यांचाही यामध्ये शोध लागणार असून त्यांचा अभ्यास केला जाणार असल्याचे डॉ. श्रीमती जोशी यांनी सांगितले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.