टाळेबंदीत रेल्वे सुरक्षा दल करोना योद्धय़ाच्या भूमिकेत
वाहतुकीसह मदतीसाठी आघाडीवर
by लोकसत्ता टीमकरोनाविरूध्दच्या लढाईत मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल सर्वच ठिकाणी अग्रभागी आहे. श्रमिक प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी, अपघात टाळण्यासाठी लोकांना ट्रॅकवर न चालण्याकरीता प्रबोधन, हजारो लोकांना मदत आणि अन्न पुरवठा, सॅनिटायझर आणि मुखपट्टीचे वाटप, विशेष गाडय़ांच्या नोंदणीत अनुचित प्रकारांमध्ये गुंतलेल्या दलालांना अटक करणे, अशी चौफेर कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे.
मध्य रेल्वेने आतापर्यंत पाच लाखाहून अधिक श्रमिकांना आणि अडकलेल्या लोकांना ३८० हून अधिक श्रमिक विशेष गाडय़ांमधून त्यांच्या गावी पाठविले आहे. या व्यवस्थेत मुखपट्टी घालण्यावर देखरेख ठेवणे, गाडीत आत जातांना, प्रवासात शारीरिक अंतराचे काटेकोर पालन यावर पाहणीसाठी १,५०० हून अधिक आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना मार्गदर्शन करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधी सल्लामसलत करणे, महिलांना सुरक्षित प्रवास करण्यास सक्षम बनविणे यासाठी आरपीएफकडून प्रयत्न करण्यात येतात. याव्यतिरिक्त, आरपीएफने औषधोपचाराची गरज असणाऱ्या प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षांना माहिती देऊन मदत केली आहे. गरजू प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना भोजन, मुखपट्टी तसेच मध्य रेल्वेवरील स्थानकांवर बंदोबस्तासाठी दररोज सुमारे १,००० आरपीएफ कर्मचारी तैनात केले जात आहेत. मध्य रेल्वे आरपीएफने गरजू व्यक्ती, प्रवाशांना स्वेच्छा योगदानामधून आतापर्यंत एकूण ३०,९५७ जणांना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. याशिवाय ६,४९६ निराधार, अडकलेल्या प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना, सहायक इत्यादींना जेवण दिले आहे.
आतापर्यंत कपडय़ांनी बनविलेल्या सुमारे १३,९१९ मुखपट्टी, १,५२२ फेसशील्ड आणि ४३४ शिल्ड मास्क संलग्न केलेले कवच या योद्धय़ांनी तयार केले आहेत.
विशेष गाडय़ांसाठी वैयक्तिक आयडी वापरुन ई तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाडय़ांमध्ये जागा राखीव करण्याच्या तक्रारी अलीकडे सुरू झाल्या आहेत. आरपीएफने हे प्रकरण रोखण्यासाठी प्रवासी आरक्षण कक्षात विशेष मोहीम राबविली. रू. ३,०४,४१० किंमतीची १४९ तिकिटे जप्त करून तीन गुन्हे दाखल केले आणि एकाला अटक केली.
जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेचे अधिकारी पुढाकार घेऊन नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळवितात. दूरध्वनी, वेब सक्षम सेवा, वेबिनार इत्यादींद्वारे त्यांचे मनोधैर्य वाढवित आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.