केईएमच्या शवागारात मृतदेह ठेवण्यास अडचण
रात्रीच्या वेळेस मृत झाल्यास दुसऱ्या दिवशी मृतदेह जाण्यास वेळ लागतो.
by लोकसत्ता टीममुंबई : केईएममध्ये करोनाबाधित किंवा संशयित रुग्णांचे दरदिवशी किमान २० ते २५ मृत्यू होत असल्याने एवढे मृतदेह ठेवायचे कुठे, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
केईएममधील शवागारात मृतदेह ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने शवागारातील व्हरांडय़ात मृतदेह ठेवल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरत असल्याने मंगळवारी दिवसभर चर्चा सुरू होती. केईएमच्या शवागारात करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी ३६ पेटय़ा उपलब्ध आहेत. दरदिवशी करोनाबाधित आणि संशयित रुग्णांचे किमान २० ते २५ मृत्यू होतात. काहीवेळेस नातेवाईक येण्यास उशीर लागल्याने हे मृतदेह शवागारात ठेवले जातात. परंतु त्यामुळे नव्याने येणारे मृतदेह ठेवण्यास अडचण निर्माण होते. अशावेळेस शवविच्छेदन विभागातही मृतदेह जमिनीवर ठेवले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळेस मृत झाल्यास दुसऱ्या दिवशी मृतदेह जाण्यास वेळ लागतो. अशा वेळेस मग व्हरांडय़ात ठेवण्याची वेळ येते. ३६ पैकी दहा पेटय़ा लहान बालकांसाठी आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात २६ पेटय़ाच उपलब्ध आहेत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी रुग्णालय प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.
कर्मचाऱ्यांचे आंदोलन
केईएमच्या वॉर्ड क्रमांक २० मध्ये कार्यरत असलेले रोजंदारीवरील सफाई कामगार सुरेंद्र सरकनिया यांचे रविवारी निधन झाले. त्यांना करोनाची लक्षणे असून चाचणी केली नाही. मंगळवार सकाळपर्यंत मृत्यूचे कारणही न दिल्याने संतप्त कमर्चाऱ्यांनी रुग्णालय आवारात त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये आणि घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी करत आंदोलन केले. कर्मचाऱ्यांना सोईसुविधा वेळेवर दिली जात नसल्याची तक्रारही यावेळी म्युनिसिपल मजदूर संघटनेने मांडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.