२८२७ इमारती कडेकोट टाळेबंदीत
टाळेबंद केलेल्या इमारतींच्या यादीत एल विभाग म्हणजेकुर्ला आणि आसपासचा परिसर आघाडीवर आहे.
by लोकसत्ता टीमप्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : अवघ्या आठ दिवसांमध्ये नवे करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईमधील आणखी १७१७ इमारती वा त्यातील काही भाग टाळेबंद करावा लागला आहे. परिणामी, मुंबईमधील टाळेबंद केलेल्या इमारती वा काही भाग यांची संख्या २८२७ झाली आहे. या टाळेबंद इमारतींमधील चार लाख ९१ हजार २३९ रहिवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र त्याच वेळी प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत २३ ठिकाणांची भर पडली असून मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे ६८४ झाली आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील ३२ लाख ९५ हजार १४३ नागरिकांना बंधने घालण्यात आली आहेत.
मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन तेथील परिसर वा इमारत प्रतिबंधित करण्यात येत होती. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना बाहेर जाण्यास वा बाहेरील व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने अलीकडेच प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना केली असून सरसकट परिसर प्रतिबंधित करण्याऐवजी संबंधित इमारत वा इमारतीचा काही भाग टाळेबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुधारित धोरणानुसार १७ मे रोजी मुंबईत ६६१ प्रतिबंधित क्षेत्रे होती, तर एक हजार ११० इमारती वा त्यांचा काही भाग टाळेबंद करण्यात आला होता. मात्र अवघ्या आठ दिवसांमध्ये, २५ मे रोजी टाळेबंद केलेल्या इमारती वा त्यांचा काही भाग यांची संख्या एक हजार ७१७ ने वाढून दोन हजार ८२७ वर पोहोचली आहे. या दोन हजार ८२७ इमारतींमधील घरांची संख्या एक लाख २१ हजार ३२९ असून तिथे पाच हजार ३९२ रुग्ण सापडले आहेत. या टाळेबंदीचा फटका चार लाख ९१ हजार २३९ रहिवाशांना बसला आहे. या इमारतींमधील पदाधिकारी रहिवाशांना करोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबासह अन्य रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
टाळेबंद केलेल्या इमारतींच्या यादीत एल विभाग म्हणजेकुर्ला आणि आसपासचा परिसर आघाडीवर आहे. येथील २२० इमारतींना टाळेबंदीला सामोरे जावे लागत असून तिथे ३८२ रुग्ण सापडले आहेत. टाळेबंद केलेल्या इमारतींमध्ये ४०४४ घरे असून १७ हजार ३८० रहिवाशांवर निर्बंध आले आहेत. त्यानंतर या यादीत के-पश्चिम म्हणजेच अंधेरी पश्चिम आणि आसपासचा परिसराचा क्रमांक लागला आहे. या विभागातील सुमारे २१८ इमारती वा त्यांचा काही भाग टाळेबंद करण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ
धोरणात पुनर्रचना केल्यानंतर १७ मे रोजी मुंबईत ६६१ प्रतिबंधित क्षेत्रे होती. आठ दिवसांच्या कालावधीत आणखी २३ ठिकाणांची भर पडली असून पालिकेच्या २५ मेच्या यादीनुसार मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे ६८४ वर पोहोचली आहेत. या ६८४ ठिकाणी सात लाख ७९ हजार ७४० घरे असून तेथे ११ हजार ३९९ रुग्ण सापडले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे ३५ लाख ९३ हजार ३८४ इतकी असून या रहिवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.