https://images.loksatta.com/2020/05/corona-1.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूरसाठी दिलासा!

मंगळवारचे सर्व ७६८ अहवाल नकारात्मक

by

कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंगळवारचा दिवस दिलासादायक ठरला. गेले काही दिवस सातत्याने करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आज प्राप्त झालेले ७६८ रुग्णांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. एकही रुग्ण सकारात्मक नसल्याचे आढळल्याने कोल्हापूरकरांना हायसे वाटले. आता जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ३७८ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ापासून करोना बाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे चाचणीचे अहवाल जाहीर झाले की कोल्हापूरकरांची चिंता वाढत असे. आज मात्र कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. आज ७८८ प्राप्त अहवालापैकी ७६८ अहवाल नकारात्मक आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही २० अहवाल नकारात्मक आहे. एकही अहवाल सकारात्मक आलेला नाही, असे डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी सांगितले.

साडेपाच हजार अहवाल प्रलंबित

दरम्यान, जिल्ह्यात आज सकारात्मक रुग्ण आढळला नसला तरी करोना बाधित रुग्णांमध्ये भर पडण्याची चिन्हे आहेत. अजूनही साडेपाच हजाराहून अधिक अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील अलगीकरण केंद्रात असणारे हजारवर लोकांच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. हे अहवाल कधी जाहीर होणार याकडे रुग्ण, नातेवाईक त्याचबरोबर नागरिकांचेही लक्ष वेधले आहे.

कोल्हापुरात निवडकांना प्रवेश

मुंबई, पुणे या लाल रेषेतील महानगरांमधून येणाऱ्या लोकांमुळे जिल्ह्यात करोनाचा प्रसार झाल्याचा सूर आहे. यामुळे या भागातून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देण्यास मर्यादा आणल्या होत्या. आता हे निर्बंध काही प्रमाणात दूर केले जात आहेत. ३१ मे पर्यंत जिल्ह्यात नव्याने ९३०० लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी ३ ते २५ मे या कालावधीत ३७ हजार ८२८ लोकांनी शहरात प्रवेश केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

साताऱ्यातही नवा रुग्ण नाही

सातारा जिल्ह्यामध्ये आज मंगळवारी दिवसभरात नव्याने एकही करोनाबाधित  निष्पन्न झालेला नाही. तर, कराडच्या कृष्णा रुग्णालयातून ९ वर्षांच्या मुलीसह ४ जण करोनामुक्त होऊन घरी परतलेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण करोनाबाधितांची संख्या ३३६ असून, सध्या २०१ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनामुक्त झालेल्यांची संख्या १२६ असून, उपचारादरम्यान ९ जण मृत्यू पावले आहेत. ताज्या माहितीनुसार ९१ जणांचे घशाच्या स्त्रावांचे नमुने तपासणी अहवालात नकारात्मक आले आहेत.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.