दोन दशकांची परंपरा यंदा खंडित
पांथस्थांची तहान भागविणाऱ्या ताकपोईची करोनामुळे विश्रांती
by लोकसत्ता टीमपांथस्थांची तहान भागविणाऱ्या ताकपोईची करोनामुळे विश्रांती
पुणे : करोना विषाणूच्या संकटामुळे पांथस्थांची तहान भागविणाऱ्या ताकपोईने यंदा विश्रांती घेतली आहे. लक्ष्मीदास ऊर्फ बच्चुभाई भायाणी यांच्या निधनानंतरही उन्हाळ्यामध्ये वाटसरूंना थंडगार ताक देणारी दोन दशकांची परंपरा या वर्षी प्रथमच खंडित झाली आहे. मात्र, पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात ताकपोई पुन्हा पुणेकरांच्या सेवेत रूजू होणार आहे.
शुक्रवार पेठेतील बदामी हौदाजवळ भायाणी यांचे लक्ष्मी स्टील हे मंगलकार्यासाठी लागणारे साहित्य भाडय़ाने देण्याचे दुकान होते. या दुकानासमोरच दररोज ताक वाटण्याची कल्पना बच्चुभाईंनी दुकानातील सर्व कामगारांना सांगितली आणि सर्वानी त्यात सहभागी होण्याची उत्स्फूर्तपणे तयारी दाखवली. सहा वर्षांपूर्वी बच्चुभाई भायाणी यांचे निधन झाले. अर्थात ताकपोईच्या उपक्रमात त्यांच्या जाण्यानंतरही खंड पडलेला नाही. त्यांचे पुत्र तुषारभाई यांनी हे कार्य अखंडपणे पुढे सुरू ठेवले आहे. या वर्षी करोना संकटामुळे ही ताकपोई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती या दुकानाचे व्यवस्थापक नितीन पुरोहित यांनी दिली.
बच्चुभाईंची ताकपोई गेल्या दोन दशकांपासून पांथस्थांची तहान भागविण्याबरोबरच रणरणत्या उन्हातील माणुसकीचा झरा जिवंत असल्याची प्रचिती देत आहे. ‘काका, गार पाणी द्या नां’, ‘काका, थोडा बर्फ द्या नां’, अशी मागणी करत खेळणारी मुले त्यांच्याकडे येत असत. ‘उन्हाळ्यात आपण थंडगार ताक वाटलं तर..’ या मनात आलेल्या विचारांतून बच्चुभाईंनी त्यांच्या दुकानासमोरच ही ताकपोई सुरू केली.
रोज सकाळी ठीक साडेदहा वाजता ताक वाटपाला सुरुवात होते आणि हे काम पुढे तीन तास चालते. ताक वाटपाचे काम दुकानातील पुरुष मंडळी करतात. तर रोज दूध आणून तापवणं, त्याला विरजण लावणं, दही घुसळून मीठ आणि जिरे पूड घालून चविष्ट ताक तयार करणे, अशी सारी कामे महिला करतात.
दररोज साधारणपणे साडेतीनशे ते चारशे ग्लास ताकाचे वाटप केले जाते. ताक पिऊन ताजेतवाने झालेले पांथस्थ या कार्याची प्रशंसा करत प्रसन्न चेहऱ्याने पुढच्या कामाला निघून जातात. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणारी ताकपोई अगदी पहिला पाऊस पडेपर्यंत म्हणजे पाच जूनपर्यंत कार्यरत असते, असे पुरोहित यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.