मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार एक जूनपासून सुरू
बैठकीत बाजार सुरू करण्याचे निश्चित
by लोकसत्ता टीमबैठकीत बाजार सुरू करण्याचे निश्चित
पुणे : गेले दीड महिने बंद असलेला श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजीपाला बाजारातील अडते संघटनेचे प्रतिनिधी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मंगळवारी (२६ मे) पार पडली. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना तसेच बाजारआवाराचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर भाजीपाला बाजार लवकरच सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार येत्या सोमवारपासून (एक जून) फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागाचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार गेले दीड महिने बंद आहे. शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मोशी, मांजरी, उत्तमनगर येथील भाजीपाला बाजार पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला. मुख्य भाजीपाला बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. पालकमंत्री अजित पवार यांनी भाजीपाला बाजार सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत मंगळवारी ( २६ मे) बैठक पार पडली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ तसेच, कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत भाजीपाला तसेच फळबाजार पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार लवकरच भाजीपाला बाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाजार आवारात होणारी गर्दी तसेच करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत गुरुवारी (२८ मे) बाजारसमिती, अडते संघटना, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड पद्धतीने बाजार सुरू ठेवावा तसेच अन्य पर्याय बैठकीत मांडण्यात आले. बाजार सुरू करण्यात आल्यानंतर सामाजिक अंतर पाळणे, जंतुनाशकांचा वापर, मुखपट्टीचा वापर, तापमापक यंत्राद्वारे तपासणी अशा उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. गुरुवारी (२८ मे) पुन्हा बैठक आयोजित केली जाणार असून या बैठकीत बाजार नेमका कधी सुरू होईल, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
– बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग एक जूनपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आडते संघटनेकडून बाजाराचे कामकाज सुरू करण्यापूर्वी बाजार समिती प्रशासनाकडे काही सूचना मांडण्यात आल्या आहेत. गुरूवारी (२८ मे) आडते संघटनेची बैठक होणार आहे. त्याच दिवशी बाजार समिती, बाजार आवारातील घटकांची बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटना
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.