पाणी समस्येकरीता झोननिहाय तत्काल बैठकी घ्या

by

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : अहवाल तयार करून सादर करण्याचेही निर्देश

https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2020/05/OCW-Mayor-Meeting-Photo-27-May-2020-1-600x400.jpg

नागपूर : उन्हाची दाहकता वाढत असतानाच नागरिकांना पाणी समस्येचाही सामना करावा लागत आहे. अनेक भागात पुरेशे प्रमाणात पाणी मिळत नाही. शहरातील अनेक भागात ही समस्या आहे. त्यामुळे यासमस्येबाबत योग्य कार्यवाही व्हावी याकरिता जलप्रदाय समिती सभापतींच्या अध्यक्षतेत प्रत्येक झोनमध्ये सर्व संबंधित अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी. तसेच या बैठकीचा अहवाल तयार करून तो सादर करावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपूर शहरातील पाण्याच्या गंभीर समस्यांबाबत नागरिक तसेच लोकप्रतिनिधींच्या प्राप्त तक्ररींचे निराकरण करण्यासंदर्भात बुधवारी (ता.२७) महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नगरसेवक नितीन साठवणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापौरांनी पाणी समस्येबाबत झोननिहाय आढावा घेतला. कमी वेळ पाणी पुरवठा, पाण्याचा संथ प्रवाह आणि वेगवेगळ्या भागात वितरण दोषामुळे दररोजच नागरिकांच्या तक्रारींचा आणि त्यांच्या रोषाचा सामना लोकप्रतिनिधींना करावा लागत आहे. यासंबंधी प्रत्येक प्रभागनिहाय आढावा घेण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत मनपाचे जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांसह बैठक घेण्यात यावी.

बैठकीमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे या सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. जलप्रदाय समिती सभापतींनी या बैठकीत येणा-या समस्या आणि त्यावरील कार्यवाही या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल तयार करून तो सादर करावा. नेहरूनगर, धंतोली, हनुमानगर या झोनमधील सर्वाधिक तक्रारींचा ओघ आहे. त्यामुळे सर्वप्रथम या तीन झोनमध्ये बैठक घेण्यात यावी, असेही महापौर संदीप जोशी यांनी निर्देश दिले.