https://images.loksatta.com/2020/05/Untitled-10-18.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूरमध्ये परप्रांतीयांचा गावचा ओघ थंडावला

गावी जाण्यासाठी आग्रह धरणारे परप्रांतीय कामगारांची आता जाण्यास टाळाटाळ

by

दयानंद लिपारे

व्यवसाय सुरू झाल्याचा परिणाम; रेल्वेतही नोंदणी केल्यानंतर निम्मेच कामगार रवाना

राज्याच्या काही भागात उद्योग सुरू होऊ लागल्याने परप्रांतीयांची गावाकडे परतण्याची ओढ थंडावली आहे. काही दिवसांपूर्वी गावाकडे जाऊ द्या म्हणून प्रशासनाकडे ओरड करणारे हे कामगार आता पुन्हा रोजगार मिळू लागल्याने इथेच थांबू लागले आहेत.

करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने देशभरात जाहीर केलेल्या टाळेबंदीला दोन महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या काळात करोनाचे भय आणि हाती नसलेले काम यामुळे परप्रांतीय मजुरांची गावी परतण्यासाठी धडपड सुरू झाली होती. मिळेल त्या साधनाने, प्रसंगी पायी गावाकडे निघालेले हे तांडे जागोजागी दिसत होते. याला आवर घालू लागताच काही दिवसांपासून या मजुरांची रस्त्यावर उतरून आंदोलनेही सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर श्रमिक रेल्वेगाडय़ांद्वारे या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान याच काळात राज्यात धोक्याचा लाल विभाग वगळता अन्यत्र परवानगी मिळाल्याने उद्योगाची चाकेही सुरू झाली. याचा परिणाम गावी धावणाऱ्या परप्रांतीय कामगारांवर झाला आहे. कालपर्यंत गावी जाण्यासाठी आग्रह धरणारे परप्रांतीय कामगार आता जाण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत.

कोल्हापुरातून गेल्या आठवडय़ापासून परराज्यात मोठय़ा संख्येने हे मजूर गावी जात होते. जिल्ह्य़ातून २५ मेपर्यंत परराज्यात गेलेल्यांची ही संख्या २७ हजारांच्या घरात आहे. परंतु गेल्या काही दिवसात येथील उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू होताच तिथे कामावर असणाऱ्या मजुरांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

गावी जाऊन बेकार राहण्यापेक्षा इथेच काम करून पोट भरण्यावर त्यांचा कल वाढू लागला आहे. परिणामस्वरूप या मजुरांसाठी सोडल्या जाणाऱ्या श्रमिक रेल्वेतील मजूर प्रवाशांच्या संख्येत मोठी घट होऊ लागली आहे. सोमवारी (दि. २५) कोल्हापुरातून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वेची प्रवासी क्षमता ८८० होती. पण पूर्ण क्षमतेने नोंदणी केल्यानंतरही केवळ ३३० मजुरांनीच कोल्हापूर सोडले.

यापूर्वी जे लोक गावी पोहोचले आहेत त्यांनी येथील कामगारांना त्यांच्या अडचणी सांगितल्या. तिथे रोजगारही नाही आणि करोनाचेही भय आहे. अशात या भागात उद्योग सुरू  झाल्याने परप्रांतीय कामगारांचे मतपरिवर्तन होऊ लागले असून मोठय़ा संख्येने हे कामगार मूळ गावी जाण्याचा भूमिकेपासून परावृत्त होताना दिसत आहेत.

-विक्रांत चव्हाण, उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर

पूर्वी ४० परप्रांतीय कामगार काम करीत होते. त्यातील निम्मे लोक मूळ गावी गेले. तेथे कामाची सोय नसल्याने ते संधी उपलब्ध होताच टाळेबंदीनंतर पुन्हा कोल्हापूरला येण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे कामगारांच्या टंचाईमुळे प्रतिदिनी ५०० रुपयांची मजुरी ७०० रुपयांवर गेली आहे. यामुळे जे उरलेत त्यांना वाढीव मजुरी मिळू लागल्याने या कामगारांचा कल पुन्हा इथे राहण्याकडे वाढू लागला आहे.

-रविराज मोरे , बांधकाम व्यावसायिक

महाराष्ट्राएवढा पूर्ण क्षमतेने रोजगार तर इथे मिळत नाहीच, पण मजुरीही महाराष्ट्राच्या तुलनेत अर्धीच मिळत आहे. टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला येऊ न आहे त्या ठिकाणीच काम मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

-रोहित मंडल, पश्चिम बंगाल, मजूर

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.