बुद्धिबळातील नवप्रवाहांचा वेध
‘लोकसत्ता सहज बोलता..बोलता’मध्ये ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे
by लोकसत्ता टीमसंगणकाधारित प्रशिक्षणाच्या कोणत्याही सोईसुविधा नसताना निव्वळ इच्छाशक्ती, बुद्धिबळाची आस आणि अपार मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर भारताचे तिसरे आणि महाराष्ट्राचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले प्रवीण ठिपसे हे ‘लोकसत्ता सहज बोलता..बोलता’च्या पुढील पर्वाचे पाहुणे आहेत.
खेळाडूबरोबरच लोकप्रिय बुद्धिबळ विश्लेषकही असलेले प्रवीण ठिपसे बुद्धिबळातील अनेक बदलत्या प्रवाहांचाही वेध घेतील. या उपक्रमाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी असून, येत्या शुक्रवारी २९ मे रोजी सायंकाळी पाच वाजता तो आयोजित करण्यात आला आहे.
करोनामुळे इतर सर्वच खेळ बंद असताना, बुद्धिबळाच्या अनेक ऑनलाइन स्पर्धा अव्याहत सुरू आहेत. ऑनलाइन स्वरूपामुळे मोठय़ा प्रमाणावर तरुणाई या खेळाकडे आकर्षित होत आहे. भारतात हा खेळ आज लोकप्रिय झाला याचे श्रेय विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे, दिव्येंदु बारुआ अशा आद्य ग्रँडमास्टरांनाही जाते. गेल्या तीन दशकांमध्ये या खेळात झालेल्या विविध बदलांचा आणि व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा या वेबसंवादात घेतला जाईल. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला आणि एकमेव बुद्धिबळ जगज्जेता. त्याचा वारसदार बनण्याची क्षमता विद्यमान कोणत्या बुद्धिबळपटूमध्ये आहे, बुद्धिबळ या खेळात कारकीर्द करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, शक्तिशाली संगणकांमुळे या खेळातील आनंद हिरावला जातो आहे का, याही विषयांवर प्रवीण ठिपसे विचार मांडतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.