https://images.loksatta.com/2020/04/bmc.jpg?w=830
(संग्रहित छायाचित्र)

‘प्रत्येकाला वैद्यकीय सुविधा देण्यास पालिका प्रशासन बांधील’

१९१६ या आपत्कालिन क्रमांकाची व्याप्ती वाढविण्यात येईल

by

मुंबईमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधेतही वाढ करण्यात येत असून प्रत्येकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास आम्ही बांधील आहोत, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी दिले.

करोनाबाधितांसाठी खाटा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध करण्याबाबत मुंबईतील ३३ मोठय़ा रुग्णालयांच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. पालिका रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण दाखल आहेत. आता या खासगी रुग्णालयांमध्ये सरकारने निश्चित केलेल्या दरात उपचार घेणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. खाटा तात्काळ उपलब्ध व्हाव्या यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात ‘डॅशबोर्ड’ सुविधा सुरू करण्यात आली असून अर्ध्या तासाने रुग्णालयांमधील खाटांबाबतची माहिती मिळत आहे.  १९१६ या आपत्कालिन क्रमांकाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही चहल यांनी सांगितले.

आयुक्त म्हणतात..

*   येत्या जूनअखेरीस करोनाबाधित आणि संशयित रुग्णांसाठी खाटांची क्षमता दीड हजारापर्यंत वाढवणार

*  आतापर्यंत पावणेदोन लाख व्यक्तींची करोनाविषयक चाचणी. ४२ लाख संशयितांची तपासणी

*  प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम तयार करून प्रत्येक खाटेला दिलेल्या युनिक आयडीद्वारे लक्ष ठेवणार

*  करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दर ७.६ वरून ३.२ टक्क्य़ांपर्यंत कमी

खाटांची उपलब्धता

करोना काळजी केंद्रात ३० हजार, डीसीएच-डीसीएचसीमध्ये १४ हजार खाटा, खासगी रुग्णालयात ७५०० खाटा उपलब्ध होतील. त्याशिवाय पालिकेच्या विभागस्तरावर २५०० खाटा, वरळीच्या एनएससीआयमध्ये ६४०, रेसकोर्सवर ३००, वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान व नेस्को येथे ५३५ खाटा उपलब्ध होतील.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.