धारावीतील ७५ टक्के बाधित रुग्ण अत्यावश्यक सेवेतील कामगार
२१ ते ६० या वयोगटांतील रुग्ण ७५ टक्के
by लोकसत्ता टीमसामाजिक अंतर अशक्य; सफाई कामगार, वॉर्डबॉय, सामान घरपोच करणाऱ्या कामगारांना करोनाचा संसर्ग
धारावीत आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ७५ टक्के रुग्ण हे २१ ते ६० वयोगटातील आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणारे हा कष्टकरी वर्ग असून त्यांचीच संख्या धारावीत जास्त आहे. सफाई कामगार, वॉर्डबॉय, सामान घरपोच करणारे कामगार अशा बाधितांचा यात समावेश असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
सामाजिक अंतर ही संकल्पनाच जिथे अशक्य आहे अशा धारावीत रोज रुग्णसंख्या वाढते आहे. आतापर्यंत दीड हजार लोक बाधित झाले आहे. साधारण अडीच किलोमीटर परिसरात पसरलेल्या या झोपडपट्टीत साधारणत: सात लाख लोकसंख्या आहे. एक किलोमीटर परिसरात अडीच लाख लोक इतकी दाट घनता या भागात आहे. चामडय़ाच्या वस्तू, मातीची भांडी आणि कपडे शिवण्याचे कारखाने या भागात मोठय़ा संख्येने आहेत. याच भागात मोठय़ा संख्येने कष्टकरी वर्ग असून तो या करोनाच्या संसर्गामुळे बाधित झाल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
२१ ते ६० या वयोगटांतील रुग्ण ७५ टक्के आहेत. यातील बरेसचे जण आरोग्य यंत्रणेत काम करणारे आहेत. त्यामुळे त्यांचा या आजाराशी रोजच जवळून संबंध येतो. तर अनेक जण कष्टकरी वर्गातील असल्याची माहिती जी उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. तर अन्य रुग्णांमध्ये बाधितांच्या निकट संपर्कातील लोकांचा समावेश आहे.
धारावीचाच एक भाग असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये पालिकेच्या कामगारांची मोठी वसाहत असून इथे रोजच मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत या भागात १८६ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर कुंभारवाडा, कुंची कुर्वे नगर, मुकुंद नगर, राजीव गांधी नगर अशा १७ वसाहतींमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण आढळत आहेत.
५२५ करोनामुक्त
* बाधित असलेल्या दीड हजार जणांपैकी ५२५ जण
आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २० जण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत तर १९ मृत हे ६० वर्षांंवरील आहेत.
* धारावीत संसर्ग आटोक्यात राहावा, रुग्णांना वेळीच शोधता यावे याकरिता पालिकेने मोठय़ा प्रमाणावर तपासण्या केल्या असून आतापर्यंत धारावीतील साडेतीन लाख रहिवाशांच्या म्हणजेच निम्म्या लोकसंख्येच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.