राज्यात काँग्रेसचा आघाडीला फक्त पाठिंबा!
राहुल गांधी यांचे वक्तव्य
by लोकसत्ता टीममहाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता नसून तिथे महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. महत्त्वाचे निर्णय काँग्रेस घेत नाही. एखाद्या राज्यात सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन्हीमध्ये फरक आहे, असे विधान मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाविकास आघाडीतील कथित मतभेदामुळे करोनाची समस्या गंभीर बनली आहे का, या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेला आहे. पण, राज्यात काँग्रेस महत्त्वाचे निर्णय घेत नाही. पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान, पुडुचेरी या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तिथे काँग्रेस धोरणात्मक निर्णय घेते.
गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टिप्पणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, महाराष्ट्र हे राज्य देशाची अमूल्य संपत्ती असून आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे राज्याला केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे. जिथे लोक अधिकाधिक संपर्कात येण्याची शक्यता असते तिथे करोनाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
टाळेबंदी फोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टाळेबंदीचा निर्णय फोल ठरला आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या पटीत वाढत असताना केंद्र सरकार आता कोणते पुढील धोरण आखणार आहे? चार टप्प्यांमध्ये टाळेबंदी लागू करूनही अपेक्षित परिणाम साधता आलेला नाही अशी टीका राहुल यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.