काळजी वाढली : पुण्यात एकाच दिवसात 399 नवे करोनाबाधित, 10 जणांचा मृत्यू
शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 181 वर पोहचली
by लोकसत्ता ऑनलाइनजगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशभरासह दिवसेंदिवस राज्यातही झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात आघाडीवर आहेत. एकट्या पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 399 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 181 झाली आहे. तर याच दरम्यान आज दिवसभरात 10 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची पुणे शहाराची संख्या 264 झाली आहे. तसेच उपचार घेत असलेल्या 175 रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 2 हजार 735 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आज तब्बल 2 हजार 436 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 60 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. 1 हजार 186 जणांना आज रुग्णालायतून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 52 हजार 667 वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुळे मृत्यू झालेले 1 हजार 695 जण व आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या 15 हजार 786 जणांचा समावेश आहे.
याचबरोबर चोवीस तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे.
देशभरातील तब्बल 1 लाख 38 हजार 845 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 77 हजार 103 जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले 57 हजार 720 व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 4 हजार 021 जणांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.