कोल्हापूर : ६८ नव्या करोनाबाधितांची नोंद, एकूण संख्या ४०९ वर
करोनावर मात केेलेल्या सहा जणांना घरी पाठवले
by दयानंद लिपारेराज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) ६८ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ४०९ पोहचली आहे. मात्र, असे असताना दुसऱ्या बाजूस सहा रुग्णांनी करोनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र देखील आज पाहायला मिळाले. काल त्रिशतक ओलांडणाऱ्या करोनाबाधितांनी आज चारशेचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. हे चित्र सोमवारी देखील कायम राहिले. आज संध्याकाळपर्यंत ६८ करोना रुग्ण आढळले. त्यामुळे काल ३४१ असणारी करोना बाधितांची संख्या आज ४०९ पोहचली. भुदरगड तालुक्यात बारा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल आहे. हा तालुका रुग्णसंख्येबाबत अर्ध शतकाकडे वाटचाल करत आहेत. सध्या या तालुक्यात ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
करोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे काही दिलासादायक घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील सहा जणांनी करोनावर मात केल्याचे आज सांगण्यात आले. सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील दोघे रुग्ण बरे झाले आहेत. त्यात माणगाव येथील वीस वर्षाचा तरुण आणि केर्ले येथील २३ वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे येथील ३५ वर्षाचा तरुण तसेच पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील तीस वर्षाचा तरुण देखील करोनामुक्त झाले आहेत. या चारही जणांवर यशस्वी उपचार करण्यात सीपीआर रुग्णालयाला यश आले आहे. या रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अठरा पॉझिटिव्ह रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.