चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांच्या स्थलांतरणाचा निर्णय; अधिकारी मात्र अनभिज्ञ
जिथे पाच वाघांचे स्थलांतरण झाले नाही, तिथे ५० वाघांचे स्थलांतरण कसे करणार? वन्यजीव अभ्यासकांना पडला प्रश्न
by रवींद्र जुनारकरमानव-वन्यजीव संघर्ष बघता वनमंत्री संजय राठोड तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यापासून या गंभीर विषयावर माध्यमात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे वाघांच्या स्थलांतरणाचा असा कुठलाही प्रस्ताव आम्ही पाठविलेला नाही किंवा याबाबत आम्हाला कल्पनाही नाही. आम्ही या संपूर्ण प्रक्रियेपासून पूर्णत: अनभिज्ञ आहोत, अशी धक्कादायक माहिती चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामाराव तथा ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. त्यामुळे नेमके खरे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील सर्वाधिक १६० पेक्षा अधिक वाघ या जिल्ह्यात आहेत. त्यातही व्याघ्र गणनेच्या चौथ्या फेज प्रमाणे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर व बफर झोनमध्ये आज घडीला ११५ वाघ व १५५ बिबट आहेत. वाघांची वाढती संख्या या जिल्ह्यासाठी नेहमीच अभिमानाचा विषय राहिला आहे. मात्र, मानव-वन्यजीव संघर्षामुळे ग्रामस्थांकडून वाघाची शिकार देखील केली जात आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील वाघांचे राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करावे असा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे.
तत्कालीन वन अधिकारी संजय ठाकरे यांनी यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील पैनगंगा व्याघ्र प्रकल्पात पाच वाघांचे स्थलांतरण करावे, असा प्रस्तावही वन्यजीव विभागाला पाठविला होता. मात्र अशा पध्दतीचे स्थलांतरणाचे प्रयोग अयशस्वी राहिल्याने प्रस्ताव बारगळला होता. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचे वनमंत्री संजय राठोड तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी पाच नाही तर तब्बल ५० वाघांचे स्थलांतरणाबाबत वन विभाग विचार करित असल्याचे सांगितले आहे. जिथे पाच वाघांचे स्थलांतरण झाले नाही तिथे ५० वाघांचे स्थलांतरण कसे करणार? हा प्रश्न आता प्रत्येक वन्यजीव अभ्यासक विचारत आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामाराव तथा ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांना तर वनमंत्री राठोड व प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्या वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयाची माहिती सुध्दा नाही. ५० वाघांच्या स्थलांतरणाचे वृत्त माध्यमात झळकताच रामाराव व प्रवीण या दोन्ही अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, रामाराव यांनी आपण ५० वाघांच्या स्थलांतरणाचा कुठलाही प्रस्ताव पाठविला नाही, अशी माहिती दिली. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागाचे रामाराव प्रमुख आहेत. तर क्षेत्र संचालक प्रवीण यांनाही वाघांच्या स्थलांतरणाबाबत माहिती नाही. वन विभागाचे हे दोन्ही अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.