मानवतेचे झरे
गरिबांचा काटकपणा, जिद्द, चिकाटी आणि आपल्या जिवावर जगण्याची त्यांची तयारी समस्त देशाला निशब्द करणारी आहे.
by लोकप्रभा टीम-सुनिता कुलकर्णी
आपल्या आजारी वडिलांना घेऊन सायकलवरून १२०० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीच्या प्रवासाची दखल इव्हांका ट्रम्प यांनाही घ्यावीशी वाटली. याशिवाय ट्रॉली बॅगेवर बसवून, कावड करून मुलांना घेऊन जाणाऱ्या, पलंगाची डोली करून आई-वडिलांना शेकडो किलोमीटर वाहून नेणाऱ्या भारतीयांची उदाहरणं गेले कित्येक दिवस माध्यमांमधून पुढे येत आहेत. गरिबांचा काटकपणा, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि सरकारवर अवलंबून न राहता आपल्या जिवावर जगण्याची त्यांची तयारी समस्त देशाला निशब्द करणारी आहे.
रस्त्यावरून चालत जाणाऱ्यांना अन्नपदार्थ, पाणी, बिस्कीटं, चपला, पैसे यांचं वाटप करून ठिकठिकाणी सर्वसामान्य माणसांनीही आपला हातभार लावला. आपल्या कुटुंबासाठी कुणीही व्यक्ती उभी राहतेच, पण वसुधैवकुटुंबकम् या भावनेनेही उभे राहणारे लोक आत्ताच्या काळातले मानवतेचे झरे आहेत.
एक उदाहरण आहे, वालवड गावातल्या महादेव सूर्यवंशी आणि कृष्णा सूर्यवंशी यांचं. प्रवीण पंडितराव पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर आपल्या गावातल्या या पितापुत्रांची कहाणी प्रसिद्ध केली आहे. विविध देवस्थांनांमध्ये पेढा तयार विकणाऱ्या या पितापुत्रांनी दोन महिन्यांपूर्वी करोना कहर सुरू झाल्यावर गाव गाठलं. शेतीसाठी पाणी हवं म्हणून तीन बोअर खणल्या, भरपूर पाणी लागलं. मग काय, त्यांनी भुईमुग, मका, पपईची लागवड केली. पण काही दिवसातच गावाला भीषण पाणीटंचाईने ग्रासलं. मग या बापलेकांनी काय करावं… त्यांनी आपलं पीक सोडून देऊन गावात वाडी वस्त्यांवर जाऊन विनामूल्य पाणी वाटायला सुरूवात केली. एवढंच नाही तर आडव्या टाक्या आणून त्यात पाणी सोडून जनावरांसाठीही पाणी उपलब्ध करून दिलं. तुम्ही हे सगळं फुकट का करता आहात? असा प्रश्न कुणीतरी त्यांना न राहवून विचारलाच. तर त्यांचं उत्तर होतं, हा देहच नाही आपला तर मग हे पाणी तरी कुठे आपलं आहे?
रस्त्यावरून चालत जाणाऱ्या लोकांचे हाल न बघवणाऱ्या अभिनेता सोनू सूदने देखील त्याच्या नीती गोयल या मैत्रिणीच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘घर भेजो’ या कार्यक्रमाअंतर्गत मानवतेचे दर्शन घडवले आहे. सोनूने ११ मे पासून हे काम सुरू केले असून आत्तापर्यंत २१ बससेवांमधून ७५० मजुरांना कर्नाटक, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पाठवले आहे. पुढील १० दिवसांमध्ये १०० हून जास्त बसेस त्याच्यामार्फत वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणार आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात त्याने आणि त्याच्या मैत्रिणीने सातत्याने साडेचार हजार मजुरांची जेवणाची व्यवस्था केली होती. त्याच्या कामामुळे बॉलिवूडमधला हा खलनायक वास्तवात मात्र नायक ठरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.