“सलमानला वाटतं सगळेच त्याच्याविरोधात कट रचत आहेत”; हृतिकने केली होती टीका
हृतिकच्या चित्रपटावर सलमानने खोचक प्रतिक्रिया दिली होती.
by लोकसत्ता ऑनलाइनअभिनेता हृतिक रोशन २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सलमान खानकडे बॉडी-बिल्डिंगचे धडे घेत होता. त्यावेळी या दोघांमध्ये चांगलीच मैत्री होती. मात्र दहा वर्षांनंतर या मैत्रीचं चित्रच पालटलं. सलमानने हृतिकच्या ‘गुजारिश’ या चित्रपटावर चांगली प्रतिक्रिया न दिल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आला.
सलमानसोबत शीतयुद्ध सुरू असतानाच हृतिकने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये पत्नी सुझान खानसोबत हजेरी लावली होती. या शोमध्ये हृतिकने सलमानवर उघडपणे टीका केली होती. रॅपिड फायरच्या राऊंडमध्ये करण जोहरने हृतिकला प्रश्न विचारला की, सलमान जर रिअल लाइफ सुपरहिरो असता तर त्याच्याकडून कोणती गोष्ट तू घेऊ इच्छितो? यावर हृतिक म्हणाला, “तुला माहितीये का, प्रत्येकजण त्याच्यावर खूप प्रेम करतो. पण त्याला असं उगाच वाटत असतं की सगळेजण मिळून त्याच्याविरोधात कट रचत आहेत. त्यामुळे त्याचा हा स्वभावगुण मी त्याच्यातून काढू इच्छितो.”
करणने सलमानसंदर्भात आणखी एक प्रश्न त्याला विचारला. एके दिवशी अचानक सकाळी तू सलमान खान बनलास तर काय करशील? यावर क्षणाचाही विलंब न करता हृतिक म्हणाला, “मी पत्रकार परिषद घेईन आणि संपूर्ण जगाला सांगेन की मी हृतिक रोशनवर किती प्रेम करतो.”
२०१० मध्ये जेव्हा हृतिक व ऐश्वर्याचा ‘गुजारिश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाविषयी बोलताना सलमान खोचकपणे म्हणाला होता, “अरे त्यात तर माशी उडत होती पण मच्छरसुद्धा हा चित्रपट बघायला गेला नाही. कोणी कुत्रा पण गेला नाही.” सलमानच्या या प्रतिक्रियेमुळे हृतिकचं मन दुखावलं गेलं. एखाद्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही तर त्यावर अशा प्रकारे टिप्पणी करू नये, असं हृतिकने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवलं होतं.
वेळेनुसार दोघांमधील कटुता संपुष्टात आली. काही महिन्यांपूर्वी हृतिकने त्याच्या ‘वॉर’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सलमानच्या ‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.