…तर विराट आणि मी चांगले मित्र असतो – अख्तर
एका व्हिडीओ पॉडकास्टमध्ये व्यक्त केलं मत
by लोकसत्ता ऑनलाइनपाकिस्तानचा वेगवान माजी गोलंदाज शोएब अख्तर हा मधल्या काळात भारतीयांच्या टीकेचा धनी झाला होता. करोनाविरोधातील लढाईसाठी भारत-पाक क्रिकेट सामने भरवून निधी जमा करावा असा प्रस्ताव त्याने ठेवला होता. या मुद्द्यावरून भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला चांगलंच सुनावलं होतं. हा एक मुद्दा सोडला, तर शोएब अख्तरची अनेक भारतीय क्रिकेटपटूंशी चांगली मैत्री आहे. हरभजन सिंग, आकाश चोप्रा, संजय मांजरेकर यांच्यासोबत त्याने बराच वेळ कॉमेंट्री बॉक्समध्ये एकत्र घालवला आहे. मैदानाबाहेरदेखील युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, मोहम्मद कैफ यांच्याशी त्याची चांगली मैत्री असल्याचे दिसून आले आहे. विराट आणि मी देखील चांगले मित्र बनू शकलो असतो, असे मत शोएब अख्तरने नुकतेच एका पॉडकास्टमध्ये व्यक्त केले.
” मी विराटपेक्षा वयाने खूपच मोठा आहे, नाही तर विराट कोहली हा माझा एकदम खास मित्रांपैकी एक असू शकला असता. कारण आम्ही दोघेही पंजाबी आहोत. आम्हा दोघांचा स्वभाव पण एकसारखाच आहे. मी त्याच्यपेक्षा ज्येष्ठ असलो तरी मी त्याचा आदर करतो. आम्ही एकमेकांचे अगदी खास मित्र बनू शकलो असतो, पण मैदानात खेळताना मात्र आम्ही कट्टर शत्रूंप्रमाणे खेळलो असतो”, असे इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाच्या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये संजय मांजरेकरांना उत्तर देताना अख्तर म्हणाला.
काही दिवसांपूर्वी अख्तर विराट-सचिन तुलनेबाबतही बोलला होता. विराटला सचिनचा वारसदार मानले जात असून विराटने कमी कालावधीत बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. पण तरीदेखील दोन युगातील दोन महान खेळाडूंची तुलना करणे अयोग्य आहे, असे मत अख्तरने व्यक्त केले होते. “सचिनने क्रिकेटच्या सर्वात कठीण युगात फलंदाजी करून स्वत:ला सिद्ध केले. जर तो आताच्या युगात क्रिकेट खेळत असता, तर त्याने सुमारे १ लाख ३० हजार धावांचा टप्पा ओलांडला असता. त्यामुळे दोन वेगळ्या युगात खेळणाऱ्या सचिन आणि विराटची तुलना करणे चांगले नाही”, असे अख्तर म्हणाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.