https://images.loksatta.com/2020/05/PMModi-4.jpg?w=830
(फाइल फोटो)

“लॉकडाउन संपल्यावर मोदींचं मंदिर बांधणार”; ‘मोदीजी की आरती’ प्रकाशित करणाऱ्या आमदाराची घोषणा

या भाजपा आमदाराने केला मोदींकडे दैवी शक्ती असल्याचा दावा

by

उत्तरखंडमधील भाजपाचे आमदार गणेश जोशी यांनी रविवारी ‘श्री मोदी जी की आरती’चे प्रकाशन केलं. यावेळी बोलताना जोशी यांनी लॉकडाउन संपल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे मंदिर बांधणार असून त्यामध्ये मोदींची मोठी मुर्ती असेल अशी घोषणा केली आहे. जोशी हे मसुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी एका भाषणामध्ये ही घोषणा केल्याचे वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे.

रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या आधीच त्यांनी शुक्रवारी करोना योद्ध्यांसाठी आयोजित केलेल्या एका कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मोदी आरतीची घोषणा केली आहे. मोदी यांच्या समर्थक असणाऱ्या डॉ. रेणू पंत यांनी ही मोदींची आरती लिहिली असून राज्याचे उच्चशिक्षण मंत्री धन सिंग रावत यांच्या उपस्थितीमध्ये या आरतीसंदर्भात घोषणा करताना आनंद होत आहे असं जोशी यांनी यावेळी म्हटलं होतं. जोशी यांनी ही घोषणा केल्यानंतर शनिवारी विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने यावर आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जोशी यांनी आपण मोदींची आरतीच नाही तर मंदिरही बांधणार आहोत अशी घोषणा केली.

“माझ्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल प्रचंड आदर आहे. ते केवळ राष्ट्रीय नेते नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत. त्यांचे नेतृत्व पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही आश्चर्य वाटले. त्यांची आरती प्रकाशित करुन मी काहीही चूक केलेली नाही. हा लॉकडाउन संपल्यानंतर मी मोदींची मुर्ती असणारे एक मंदिर उभारणार आहे,” असं मत रविवारीच्या कार्यक्रमातील भाषणामध्ये जोशी यांनी व्यक्त केलं.

मोदींकडे दैवी शक्ती आहे

पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना, “ते दिवसातून १८ तास काम करतात. यावरुनच अंदाज येतो की त्यांच्याकडे कोणती तरी दैवी शक्ती आहे. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या भावनेमधूनच मी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे” असं जोशी यांनी स्पष्ट केलं. इतकच नाही तर आपण पंतप्रधान मोदींचा फोटो घरातील देवघरामध्ये ठेवला आहे असंही जोशी यांनी सांगितलं. “माझ्या घरातील देवघरामध्ये देवांच्या बाजूला मी त्यांचा फोटो ठेवला आहे. देवांची पुजा केल्यानंतर मी त्यांच्याप्रती माझा आदर व्यक्त करतो. १९९९ पासून म्हणजेच ते एक सामान्य कार्यकर्ता होते तेव्हापासून मी त्यांचा फोटो माझ्या कार्यालयामध्ये ठेवला आहे. मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे,” असंही जोशी आपल्या भाषणात म्हणाले.

व्हॉट्सअपवर आली आरती

“माझ्या सहकाऱ्याला व्हॉट्सअपवर ही आरती कोणीतरी पाठवली. त्याने ती मला दाखवली. मलाही ही आरती खूप आवडली. ही आरती मी पॅम्पलेटवर छापून घेतली आणि तिचे प्रकाशन केले. भविष्यातही मला असा कोणता मजकूर मिळाला तर मी हेच करेन,” असं मोदी आरतीबद्दल बोलताना जोशी यांनी सांगितलं.

काय आहे आरतीमध्ये

जोशी यांनी प्रकाशित केलेल्या आरतीमध्ये मोदींच्या शक्तीला सारं जग घाबरत असून विरोध त्यांच्या जवळही जायला घाबरतात असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मोदींच्या प्रभावाने ट्रम्प यांनाही आश्चर्य वाटल्याचे आरतीमध्ये म्हटलं आहे. तसेच राम मंदिर बांधणे आणि कलम ३७० रद्द केल्याबद्दलही मोदींचे कौतुक या आरतीमध्ये करण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून टीका

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत धस्माना यांनी या आरतीवरुन जोशी यांच्यावर टीका केली आहे. “हा अंधभक्तीचा उत्तम नमुना आहे. एखाद्या कार्यकर्त्याने असं काही केलं असतं तर आम्हाला काहीच हरकत नव्हती. मात्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमामध्ये या आरतीचे प्रकाशन होणे निंदनिय आहे,” असं धस्माना म्हणाले. इतकच नाही तर या आरतीमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही धस्माना यांनी केला आहे. “भगवान हनुमानाच्या आरतीमध्येच मोदींचे नाव टाकून ही आरती बनवण्यात आली आहे,” असं धस्माना यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या टीकेवर जोशी म्हणतात…

“आम्हाला शिकवणारे ते कोण आहेत? आम्हाला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्हाला जनेतेकडून प्रमाणपत्र हवं आहे,” असं जोशी यांनी काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. जोशी यांनी असं म्हटलं असलं तरी राज्यातील भाजपाने या प्रकरणासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही आरती पक्षेकडून अधिकृत करण्यात आलेली नाही असं उत्तराखंड भाजपाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.