Viral Video: जंगलातील थरार कॅमेऱ्यात कैद; चित्ता वेगाने पाठलाग करताना वापरतो ‘ही’ शक्कल
१२४ किमी प्रती तास वेगाने धावू शकतो चित्ता
by लोकसत्ता ऑनलाइनजंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. येथे जिवंत राहण्यासाठी रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
जंगलामध्ये होणाऱ्या शिकारीचे अनेक व्हिडिओ आपण डिस्कव्हरी किंवा नॅन्शनल जिओग्राफिक्ससारख्या वहिन्यांवर पाहिले असतील. मात्र सध्या ट्विटवर अशाच एक शिकार करण्यासंदर्भातील व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चित्ता हरिणाचा पाठलाग करताना दिसत आहे. भारतीय वन खात्यातील अधिकारी (आयएफएस अधिकारी) असणाऱ्या सुशांत नंदा यांनी ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या सहा सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये चित्ता हरिणाचा पाठलाग करता दिसत आहे. आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने धावणारे हरिण हुलकावण्या देत पळत आहे. मात्र हरणाच्या मागे लागलेला चित्ता आपल्या शेपटीच्या सहाय्याने शरीराचे संतुलन कायम ठेवत अत्यंत वेगाने त्याचा पाठलाग करताना व्हिडिओत दिसत आहे. “शिकार करताना मांजर प्रजातीमधील सर्वात वेगवान प्राणी असणारा चित्ता स्वत:च्या शेवपटीचा वापर कसा करतो पाहा,” अशी कॅप्शन नंदा यांनी या व्हिडिओ दिली आहे.
हा व्हिडिओ नीट पाहिला तर चित्ता वेगाने धावताना आपल्या शरिराचे संतुलन कायम ठेवण्यासाठी शेपटीचा आधार घेताना दिसतो. चित्ता ज्या दिशेने वळतो त्याच्या विरुद्ध दिशेला त्याची शेपटी वळताना या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसते.
नंदा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला १८ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. अनेकांनी या चित्तथरारक पाठलागाचे पुढे काय झाले असा प्रश्न विचारला आहे. मात्र याला नंदा यांनी उत्तर दिलेले नाही. चित्ता सर्वाधिक वेगाने पळणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. चित्ता तासाला १२४ किलोमीटर वेगाने धावू शकतो. त्याचे नाजूक पाय आणि लांब शेपूट या दोघांमुळे तो इतक्या वेगाने वेडीवाकडी वळणं घेत शिकाराची पाठलाग करु शकतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.