https://images.loksatta.com/2020/05/Siddhivinayak.jpg?w=830

सिद्धिविनायकाचा पुन्हा रक्तदान महायज्ञ!

मुंबईतल्या रुग्णांना रक्त उपलब्ध करण्यासाठी संकल्प

by

संदीप आचार्य 
मुंबईतील दादर येथील सिद्धिविनायक मंदिर लाखो लोकांचे श्रद्धास्थान. राजकारणी, चित्रपट अभिनेत्यांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वजण सिद्धिविनायकाच्या चरणी श्रद्धेने डोकं टेकतात. याच सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त समितीने करोनामुळे उद्भवलेल्या मुंबईतील रक्ताची टंचाई लक्षात घेऊन पुन्हा एकदा रक्तदानाचा महायज्ञ सुरु केला आहे.

“या रक्तदान महायज्ञात आतापर्यत एक हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या असून आज बोरिवली येथे आयोजित रक्तदान शिबीरात पन्नासहून अधिक रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या आहेत” असे सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले. करोनाची लागण मार्चमध्ये उद्भवल्याबरोबर सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुंबईत रक्तदान महायज्ञ सुरु केला होता. तथापि करोनाच्या वाढत्या संख्येबरोबर नियोजित शस्त्रक्रिया रद्द झाल्याने तसेच टाळेबंदीमुळे रक्ताची आवश्यकता कमी झाल्याने हा यज्ञ थांबवण्यात आला होता. दरम्यान दीड महिन्यानंतर आता पुन्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले.

मुंबईत थॅलेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांना नियमित रक्ताची गरज लागते. तसेच पालिका व काही खासगी रुग्णालयात पूर्वनिर्धारित शस्त्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आल्यामुळे रक्ताची गरज निर्माण झाली. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी हे आव्हान स्वीकारत पुन्हा रक्तदान महायज्ञ सुरु केला. याबाबत आदेश बांदेकर यांना विचारले असता “छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून दहिसरपर्यंत व दुसरीकडे मुलुंडपर्यंत रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्यात आले असून जे जे महानगर रक्तपेढीच्या समन्वयातून ही रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. सोमवारी बोरीवली येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून उद्या प्रभादेवी येथे तर त्यानंतरच्या पाच दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे” असे आदेश बांदेकर म्हणाले.

शिवसेनेच्या अनेक शाखांनी रक्तदानासाठी सिद्धिविनायकाकडे नोंदणी केली असून जागोजागी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या ठिकाणी चहा-कॉफी व बिस्किटे तसेच शिबीर आयोजित करणाऱ्या डॉक्टरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी शिवसेनेच्या जागोजागीच्या शाखाप्रमुखांनी दाखवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील रुग्णांना लागेल तेवढे रक्त उभे करून देण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध असल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.