खरं बोललात की तुम्हाला वेडं ठरवतात – युनिस खान
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितला वाईट अनुभव
by लोकसत्ता ऑनलाइनभारत आणि पाकिस्तान यांच्यात एक गोष्ट सारखी आहे… ती म्हणजे क्रिकेटप्रेम! पाकिस्तानातदेखील क्रिकेटपटूंना एक वेगळंच स्थान दिलं जातं. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मात्र क्रिकेटपटूंच्या प्रतिभेचा नीट वापर करून घेता आला नाही असे मत वेगवान माजी गोलंदाज शोएब अख्तर याने केलं होतं. तसेच पाकिस्तानी समालोचक रमीझ राजा याने पाकिस्तानी क्रिकेटला मॅच फिक्सिंगची कीड लागली असल्याचं म्हटलं होतं. इतकेच नव्हे तर पाकिस्तानच्या संघात खेळणारा दानिश कनेरिया याला हिंदू असल्याने वाईट वागणूक देण्यात आल्याचेही अख्तरने सांगितले होते. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटला मान खाली घालायला लावणारी एक गोष्ट माजी पाकिस्तानी कर्णधाराने सांगितली आहे.
युनिस खान
पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खान याने एका प्रसारमाध्यमाशी बोलताना कर्णधारपद सोडण्यामागचं कारण सांगितलं. “तुम्ही बऱ्याचदा खरं बोललात की तुम्हाला (पाकिस्तानात) वेडं ठरवलं जातं. मी काही ठराविक खेळाडूंविरूद्ध तक्रार केली होती की ते खेळाडू मैदानावर खेळताना चांगला खेळ करण्याचा १०० प्रयत्न करत नाहीत. तीच माझी मोठी चूक झाली. माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं की नेहमी खरं बोलावं आणि आपलं मत नम्रपणे मांडावं. मीदेखील तेच करायचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही फरक पडला नाही”, असे युनिस खान म्हणाला.
“मी ज्या खेळाडूंविरोधात तक्रार केली होती त्या खेळाडूंसोबत मी त्यानंतर अनेक सामने खेळलो. मला त्यांच्यासोबत खेळताना काहीही समस्या उद्भवली नाही. पण माझ्या तक्रारीनंतरही त्यांचा खेळ तसाच होता. त्यांच्या वाईट कामगिरीचा त्यांना नंतर फटका बसला”, असेही त्याने नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.