“राज्यात आमचं नाही तर शिवसेनेचं सरकार”, पृथ्वीराज चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
पृथ्वीराज चव्हाणांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
by लोकसत्ता ऑनलाइनराज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याने खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण राज्यात शिवसेनेचं सरकार असल्याचं सांगत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतानाही पृथ्वीराज चव्हाण यांनी असं वक्तव्य केल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान या ऑडिओ क्लिपवर अद्याप पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही.
स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने एका कार्यकर्त्याने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता. यावेळी पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत की, “मी काही आज मंत्रीमंडळात नाही. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे होईल असं वाटत नाही”.
यावर समोरील कार्यकर्ता निधी उपलब्ध आहे. आयुक्तांकडे ट्रान्सफर केला आहे असं सांगतो. त्यावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण सांगतात की, “करोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे. नव्याने घ्यावं लागेल”. परिस्थिती बिकट आहे लोकांची, चार जणांनी आत्महत्या केली आहे असं समोरील कार्यकर्ता सांगतो तेव्हा “मी शिफारस करतो सांगितलं आहे. मी मंत्रिमंडळात नाही” असा पुनरुच्चार पृथ्वीराज चव्हाण करतात.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया –
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “कारण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. सरकार महाविकास आघाडीचं आहे. पद्धत अशी असते की, मुख्यमंत्री ज्या पक्षाचा असतो त्याच्या नावाने सरकार ओळखलं जातं”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.