“तुमचं क्रीडाक्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील”
महान क्रीडापटूला पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
by लोकसत्ता ऑनलाइनऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू आणि माजी कर्णधार बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते विविध प्रकारच्या आजारांशी दोन हात करत होते. बलबीर सिंग यांना ८ मे रोजी मोहलीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. “पद्मश्री बलबीर सिंग जी हे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील संस्मरणीय कामगिरीबद्दल नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी अनेकदा अभिमानाने आणि धैर्याने आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले. ते एक उत्कृष्ट हॉकीपटू होतेच, त्यासोबत एक मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने मी अतिशय दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. त्यांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो”, अशा शब्दात मोदी यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.
भारतीय हॉकी संघात आक्रमण फळीत (फॉरवर्ड) खेळणारे बलबीर सिंग हे एक प्रतिभावंत क्रीडापटू होते. १९४८, १९५२ आणि १९५६ असे सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. भारतीय संघ हॉकी विश्वचषक स्पर्धेत सर्वप्रथम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सहभागी झाला होता. १९७५ साली मलेशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली.
बलबीर सिंग सिनियर
बलबीर सिंग यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरूष हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम अजूनही बलबीर सिंग यांच्याच नावे आहे. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपददेखील भूषवले. १९५६ साली मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.