झाडावर प्रेम करणारा माणूस!
तेंव्हा तो बाबा रनछोडदासही बनतो.
by लोकसत्ता ऑनलाइन– करणकुमार जयवंत पोले
माझा मित्रच आहे तो. अत्रंगी आहे. आजकाल सकाळी उठून व्यायाम वैगरे मनावर घेतलंय त्यानं. सर्वांनीच सकाळी उठाव व्यायाम करावा यासाठी तो वेगवेगळे बहाणे करून लोकांच्या खोल्यांचे दरवाजे बडवत असतो. मला उशिरा उठायची सवय असतानापण सकाळी सकाळी घशात गरम पाणि ओततो. दररोज सायंकाळी मटकी, हरबरा, मुंग भिजवायला घालतो आणि सकाळी व्यायाम झाला की कच्चच खातो. कधी कधी थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर आईसारखं अंगावर अंथरूण टाकतो. खूप काळजीवाहू आहे. अभ्यासाच टेंशन आलं की त्याच्या जवळ जावं तेंव्हा बाबा रनछोडदासही बनतो. हॉस्टेलमधल्या नळातून पाणि वाया जाणं म्हणजे याचा जीव जाण्यासारखं आहे. प्रत्येक नळासमोर त्याने काढलेल तहानलेल्या दुष्काळी माणसाच चित्र पाहिल्यानंतर पाणि सांडवणाऱ्यांच्या डोळ्यांतही पाणि येतं.
हॉस्टेलमध्ये शाम्पूच्या पुड्या, साबणाची थोटकं यासाठी महाशयांनी स्वखर्चातून ट्रे आनून ठेवले आहेत न्हाणीघराच्या प्रत्येक खिडकीत. जेणेकरून कुठं ब्लॉकेज होऊन ड्रेनेज थांबू नये. यांना नशिबान दोन खिडक्यांची रूम मिळाली. खिडकी उघडली की जनू सह्याद्रीच्या रांगेत हेलिकॉप्टरच दार उघडाव असं वाटेल. त्या खिडकीत बऱ्याच प्रजाती वाढवलेल्या दिसतील मोठ्या झाडांची लहान मुलं. म्हणजे त्यांना थोड्या दिवस तो त्याच्याजवळ वाढवतो खिडकीत आणि नंतर मुक्त मायभूच्या स्वाधीन करतो. त्यामुळं आम्हाला ऑक्सिजन नावाच्या वायूची कधी कमी पडली नाही. म्हणजे प्राणवायूची! मग त्यांना हॉस्टेलच्या मागे जिथं जागा दिसलं तिथं लावण्याचा प्रयत्न.
शनिवारी-रविवारी त्या झाडांना पाणि घालण्यासाठी सकाळीच बकीटांची आदळ आपट. तसं आमच्या कृषि महाविद्यालय पुणेचा परिसर तसा देखणाच. वृक्षराजींनी सजलेला! आता पुण्यातल्या भाऊगर्दीत अश्या गोष्टी पोस्टी घेऊन झोपायला मिळाल्यावर कुणाला हेवा वाटणार नाही. खरं तर कुणी स्वागत करण्यासाठी गेटवर नसतानाही गेटच्या आतमध्ये डोकावून पाहणाऱ्या पुणेकरांच स्वागत ही अनेक वर्षांपासून उभी असलेली वृक्षराजी करतं असते. आणि मन काही वर्षां साठी नाही तर आयुष्यभरासाठी या ना त्या कारणाने इथेच कायम वसून जात… देहाचा उगाच प्रवास सुरू असतो फक्त.
तर असो. या अवलियाच नाव आहे पुष्पक राठोड. त्यांची हॉस्टेल मागची झाड जोमानं वाढायला लागली. तसंतर आता पर्यंत त्यांना अनेक मुलींची प्रपोजल आलीत पण या महाशयाला त्यापैकी कुणी आवडलं नाही. पण जी आवडली त्यांना हे आवडले नाही. त्यामुळं त्यांनी आपलं प्रेम झाडांत पाहिल आणि त्यांनाच आपलं सर्वस्व वाहील. कधी कधी आम्हाला कंटाळा आता. बोअर झालं तर आम्ही एखादा चित्रपट वैगरे पहायला किंवा FC रोडला फेरफटका मारत असतो आणि हा पुष्पक हॉस्टेलच्या मागे मंदिराकड जाताना दिसतो. कधी कधी तो त्या झाडांना बोलतांना आम्हाला दिसायचा तर कधी कधी त्यांच्यासाठी अंगाईगीतही गायचा. आजच्या या एकाकी काळात मोठ्या शांततेने दुःख ऐकून घेणारं त्याला कुणीतरी भेटल होत. ऐरवी नेहमीच कुणातरी दुःख सांगू आपण, पण तोही एक दिवस आपल्याला कंटाळून जाणारच. पण पुष्पकच असं नव्हत. तो मन भरुन आलं की हलकं होऊन यायचा. त्या अबोल जिवांशी संवाद साधायचा. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्नता असायची. झाडांशी संवाद साधण्यामुळे त्याची नाळ मात्र त्यांच्याची घट्ट जुळत गेली.
प्रेयसीला भेटल्यासारखं वाटतं असाव त्याला. मागच्या चार वर्षांत ही झाड खूप मोठी झाली होती. त्यां झाडांवर अनेक सजीवांच घरं बनून गेलं होतं. अनेक पक्षी झाडांवर खोपे करायचे. संध्याकाळ झाली की सगळा चिवचिवाट! खरी संपत्ती वाटायची ही त्याला. पुण्यासारख्या शहराच्या मध्यभागी अस दृश्य दिसणं शक्यतो तो विरळाच. पुण्यात जन्मलेली मुले ज्यांनी कधीतरी झाडं चित्रात पाहिली होती. ती लहान नाजूक मुलं या झाडांच्या छायेत खूप फुललेली वाटायची. अनेकांचे पालक आपल्या मुलांना आजकाल चिऊ-काऊची गोष्टं सांगण विरसरुन गेले होते. पण त्या चिमण्या ते कावळे, त्यांचा चिवचिवाट पाहून त्यांनी त्यांच्या गावाकडे लहानपणी ऐकलेल्या गोष्टींची आठवण त्यांना व्हायची आणि जणू एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुन्हा एकदा संवेदन मनांच्या गोष्टींची देवाणघेवान सुरू व्हायची. बाहेर श्वासही घेऊ शकतं नसलेले ती सुकलेली तान्ही मुलं जाताना फुलेलेली सुखावलेली वाटायची आणि तो आनंद, प्रकाश जसा परावर्तीत होतं असतो तसाच पुष्पकच्या चेहऱ्यावर चमकायचा. अश्या हजारों चेहऱ्यांची चमक घेऊन तो खुशीत जगायचा.
एखाद्या रविवारी ग्रंथालय बंद असेल आणि विषेश म्हणजे परिक्षेचा कालावधी असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यान एक एक झाड सकाळपासूनच पकडून ठेवलेल असायच. मग दिवसभर झाडाच्या थंडगार सावलीखाली आभ्यास. दुपारी थोडी झोप. मन सुखावून जायचं. पुष्पकचा मात्र तिकडंच जास्त आभ्यास व्हायचा. तो दिवसभर तिकडच थांबायचा. तो फक्त झाडच लावायचा नाही तर त्यांचे गुणपण माणसांत पेरायचा. तो लहान असल्यापासूनच त्याच्यावर असे संस्कार झाले असे तो सांगतो. लहान असताना त्याच्या घरच्या परसात त्याच्या आईने अनेक झाडे लावलेली तो पहायचा. शिक्षकांनी सांगितलेले झाडांचे गुण अंगीकृत करण्याचा प्रयत्न करायचा. झाडांकडून काय घ्याव हे मराठीच्या पुस्तकातले संत तुकारामांचे अभंगही त्याला फक्त पाठच नव्हते तर त्याच्यात ते मुरलेले होते. भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्या आईने जस सांगितल होतं बाळा सायंकाळी झाडाला हात लाऊ नये ती झोपलेली असतात. तसंच ह्याच्या आईनही याला झाडांनाही भावना असतात फक्त आपण त्या ओळखायला हव्या हे अप्रत्यक्षपणे शिकवल होतं. अबोलांवरही प्रेम करन त्यातूनच शिकला होता तो.
अलिकड बीडला सयाजी शिंदे यांनी पहिल वृक्षसंमेलन भरवण्यात येणार हे घोषित केल आणि त्याला कोण आनंद झाला. त्यांच्या सह्याद्री देवराईमुळे आपणही भविष्यात अशीच देवराई उभारणार हे त्यांन ठरवून टाकल. आजच्या इतक्या मोठ्या तंत्रज्ञानाच्या युगातही लोकं किती श्रद्धाळू झाले आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी पुष्पक अनेक युक्त्या नेहमीच सुचवतो. तो म्हणतो आजकालच्या या मॉडर्न महाराजांनी लोकांना सांगाव तू लिंबाचं झाड लाव तुझं लग्न होईल. दुसरं कुणाला सांगाव तू आंब्याचं झाड लाव तुला नोकरी लागेल. आणि प्रत्येक गावात एक अशी देवराईपण उभारावी आणि गावातल्या मंदिराच्या पुजाऱ्यान सांगव देव जिथे वास करतो ती देवराई म्हणजे जेणेकरून तिथल्या झाडाच्या पानालाही कुणी हात लावणार नाही किंवा तो असं सुचवतो प्रत्येक झाडावर शेंदूर फासावा किंवा हिरवा शालूच नेसंवावा प्रत्येक झाडावर किंवा सांगाव की कुठल्या झाडावर भूत आहे म्हणून. लोकांना विज्ञानाच्या भाषेत कळत नसेल तर आध्यात्माच्या नाही तर अंधश्रद्धच्या का होईनापण भाषेत सांगा पण झाडे जगवा. तरंच सगळी सृष्टी जगेल!!!
झाडाच पान जरी तोडल तर चिडणाऱ्या पुष्पकवर मात्र रडण्याची वेळ लवकरच आली. झालं असं की अश्या सुंदर वनराईने नटलेल्या गोड कॉलेजात “महामाया” येणार म्हणून मोठा जल्लोष सुरू झाला होता. खूप सारे जन आनंदात होते. आता ही महामाया कोण??? आता मेट्रोला महामाया म्हणंण्याचा प्रतापपण त्याचाच! तर ती तिचं हो “पुणे मेट्रो” आता ही महामाया बऱ्यापैकी आपल्या पुण्याच प्रदूषण कमी करणार, ट्राफिक कमी …स्वच्छ पुणे. म्हणून सर्व पुणेकर खूप आनंदी. त्यात आमचे कृषिदुत म्हणवनारे तर माहोल करतं होते. मंत्रीसाहेबांची भाषणे उद्घाटने आटोपून झाली एकदाची. आमचे महाशय खूप नाराज होऊन खोलीत बसलेले. त्यांना आवडणारी मुलगी ज्या दिवशी त्यांना नाही म्हणाली त्या दिवशी तो इतका नाराज नव्हता पण आज त्याचे सवंगडी दोस्त त्याला सोडून जाणार म्हणल्यावर त्याला खूप दुःख झाले. दुसऱ्याच दिवशी कामाला सुरवात झाली. मेट्रोच्या साइटसाठी मोठी लोखंडी भिंत रोवण्यात आली. त्यावर लिहील होतं-
“ट्राफीक होईल कमी…
प्रदूषणावर मात!!!
थाट राखण्या पुणेकरांचा…
मेट्रो पळेल सुसाट!!!”
हे वाक्य वाचताच तो म्हणाला. माझी झाडं तोडली जातील त्यामुळं ट्राफीक कमी होईल??? प्रदूषणपण कमी होईल??? पण त्या झाडावर नुकताच खोपा करतं असलेल्या सुगरनीच काय? पलीकडे चिऊताईच्या खोप्यातली पिल नुकतीच अंड्यातून निघाली त्या पिल्लाच काय? या शहराच्या वास्तवतेला कंटाळलेल्या एकाकी मनांच काय? त्या नुकत्याच फुलू लागलेल्या मुलांच काय? आणि माझ्या जिव्हाळ्याच काय ? याची भरपाई कोण देणार आहे? त्याला अनेकांनी सांगीतल, ‘कुठल्यातरी प्रदेशात… कुठल्याशा झाडावर… कुठल्या पक्षाचा खोपा आहे… त्यात अंड्यातून निघालेल डोळे मिटलेल पिल्लू आहेे आणि त्यासाठी येवढा मोठा प्रकल्प थांबवावा आणि त्या पिलास पंख फुटू द्यावे. त्याची उंच भरारी आपण पहावी.
गोड कविता सुचावी!!! यासाठी ना आजच्या माणसाजवळ तेवढा वेळ आहे ना तेवढी संवेदना आहे. प्रगती महत्त्वाची आहे. सुखी जिवन जगण्यासाठी सोयीसुविधा नकोत का?’ त्यावर तो म्हणाला, “आजकाल माणसाच्या मनाच बोनसाय झालंय. मानवी मन रुक्ष झालंय. त्याला काय कळणार ह्या संवेदनशीलतेचा सुगंधीत गारवा?” आणि पुष्पक पुन्हा बोलायला लागला. त्याच्या बोलण्यातून त्याच झाडावरच प्रेम जाणवत होतं आणि ऐकणाऱ्यांचे डोळे उघडे होतं होते, ‘उजाड झालेल्या ह्या शहरांच काय असू दया ही तरी शहरं आहेत. पण ओसाड गावाकडंच्या त्या बांधावर एक झाड उभं नाही आज! आम्ही प्रगती नक्कीच करावी. पण त्या प्रगतीची मुळ असायला हवीत झाडांसारखीच खोल. तरंच फळ येतील त्या प्रगतीला विकासारखी गोड! झाडाचे फायदे सांगून काय उपयोग? आजकाल झाडांचे फायदे सांगण म्हणजे एखाद्या आईला तुझा मुलगा किती गुणी आहे हे सांगण्यासारखं आहे.
जग आज जळत येतं आहे आणि तेवढंच जळतही आहेच! अमेझॉन तर गेल्या पन्नास वर्षात अर्ध झालंय आणि ह्या पृथ्वीच फुप्फुसपन जळून गेलंय अर्ध! काल कांगारुंच्या आस्ट्रेलियाचे हाल पाहिले आणि त्या प्राण्यांचे कोरडे अश्रू पाहून आमच्याइकडं हिवाळ्यातपण पाऊस पडला आणि आमचा शेतकरी राजा अवकाळीपणान पुन्हा एकदा धायमोकलून रडला. जिथं संतुलन नसेल तिथं गोष्टी बिघडतात हा थर्मोडायनामीकचा नियम आहे. झाड तोंडानं म्हणजे चेष्टा नाही तर आपल्या समोरच्या पिढ्यांचा जीव घेणं आहे. एक झाड लावणं म्हणजे हजारो टनच कर्ब साठून ठेवणं असतं. ही गोष्टं आम्हाला आज नाही कळणार. पण खूप मोठा बंगला बांधून ठेवणाऱ्या बापापेक्षा झाड लावून देवराई उभी केलेल्या बापाचा जास्त अभिमान वाटेल समोरच्या पिढीला!!!”
polekaran@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.