केजरीवाल म्हणतात, “करोना झाला आणि लोकं बरी होऊन घरी गेली तर चालेल; फक्त…”
करोनाचा सामना करण्यासाठी दिल्ली सज्ज, सरकारी रुग्णालयात ३ हजार बेड
by लोकसत्ता ऑनलाइनदेशभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं असलं तरी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मात्र मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दिल्लीत सुट देण्याचा निर्णय घेतला होता. आज (सोमवार) केजरीवाल यांनी जनतेला संबोधित केलं. “करोना व्हायरसनिमित्ता जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये सुट मिळाली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. करोनाचे जेवढे रुग्ण रोज सापडत आहेत, तेवढेच रुग्ण बरेही होत आहेत. दिल्ली करोनाचा सामना करण्यासाठी तयार आहे. सध्या करोना जाणार नाही. त्यामुळे काम सुरू ठेवण्यासाठी ही सुट देणं आवश्यक होतं,” असं केजरीवाल म्हणाले.
लॉकडाउनमधून सुट दिली असली म्हणून कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही. करोनाची लागण होत असली तरी त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. करोनामुळे फक्त कोणाचा मृत्यू होऊ नये. आतापर्यंत दिल्लीत दिल्लीत १३ हजार ४१८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ६ हजार जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचं केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयांनाही फटकारलं.
सरकारी रुग्णालयात ३ हजार बेड
“सरकारी रुग्णालयांमध्ये ३ हजार ८२९ बेड आहेत. त्यापैकी ३ हजार १६४ साठी ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. करोनाच्या उपचारामध्ये ऑक्सिजनची सर्वाधिक गरज भारते. सध्या यापैकी १ हजार ५०० बेड भरलेले आहेत,” असंही ते म्हणाले. सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये २५० व्हेंटिलेटर्स आहेत त्यापैकी केवळ ११ व्हेंटिलेटर्स वापरले जात आहेत. खासगी रुग्णालयातही ६७७ करोना बेड्स आहेत. यापैकी ५०९ बेड्स भरलेले आहेत. त्यांच्याकडे ७२ व्हेंटिलेटर्स असून त्यापैकी १५ वापरात असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. “सध्या करोनाच्या केसेसपैकी सर्वाधिक केसेस या सूक्ष्म लक्षणं असलेल्या आहेत. त्यात थोडा खोकला आणि ताप येतो. काही जणांमध्ये ही लक्षणदेखील नाहीत. चाचणी केल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं समजतं. काही जणांवर घरात उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्याही संपर्कात आहेत,” असं त्यांनी नमूद केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.