Viral video: कावळ्याची कमाल! अडकलेल्या प्राण्याला रस्ता ओलांडण्यास केली मदत
व्हिडीओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल, मिळाले २१ लाख व्ह्यूज
by लोकसत्ता ऑनलाइनपशू-पक्षांमधील समजूदारपणा, निस्वार्थीपणा आणि करुणेचं दर्शन माणसाला अनेकदा घडलं आहे. त्यांच्यापासून मनुष्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तर जगभरात कुठेही घडलेली अशी मनाला भावणारी एखादी घटना क्षणात व्हायरल होते. प्राण्यांमधील दयाळूपणाचे अनेक व्हायरल व्हिडिओ पहायला मिळतात. त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. ती म्हणजे एका कावळ्याने हेजहोग नावाच्या प्रणाचा जीव वाचवल्याच्या व्हिडीओची. हा व्हिडीओ तुम्हाला संपूर्ण दिवसभर आनंद मिळवून देऊ शकतो. ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये वाहनांची ये-जा सुरु असलेल्या एका मुख्य रस्त्यावर एक हेजहोग नावाचा प्राणी रस्त्यातच थांबल्याचे दिसत आहे. मात्र, त्याची ही अवस्था पाहून एक कावळा रस्त्यावर येतो आणि त्याला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो. StanceGrounded (@_SJPeace_) या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला कॅप्शनही दिली आहे. “रस्त्यात अडकलेल्या हेजहोगचा मृत्यू होऊ नये म्हणून एक कावळा त्याला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करीत आहे. सगळे हिरो हे कॅपच घालतात असं नाही,” असं त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. यावरुन त्यानं हेजहोगचे प्राण वाचवणाऱ्या कावळ्याला एखाद्या पोलीस हिरोप्रमाणं उपमा दिली आहे.
या व्हिडिओमध्ये हेजहोग आणि कावळा रस्त्याच्या मधोमध थांबलेले आहेत. त्याचवेळी एक कार त्यांच्या अंगावरुन जाणार असते. मात्र, चालक कारची गती मंद करतो आणि संबंधीत घटनेचं चित्रीकरण करतो. यामध्ये कावळा या हेजहोगला आपल्या चोचीने पाठीमागून पुढे ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी तो कुठल्याही वाहनाची पर्वा न करता एकसारखं त्या प्राण्याला माठीमागून पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. जोपर्यंत हेजहोग रस्त्याच्या कडेला पोहोचत नाही तोपर्यंत तो त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो.
ट्विटरच्या माध्यमातून हा व्हायरल व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हाययरल झाला आहे. तो २.१ मिलियन लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सला इतका आवडला आहे की त्यांनी कमेंटमध्ये या कावळ्यासाठी अक्षरशः प्रार्थना केल्या आहेत. तसेच काहींनी ही घटना आपल्या प्रत्यक्ष जीवनातील इतर घटनांशी जोडून पाहिली आहे. एकानं कमेंटमध्ये म्हटलं की, मी हेजहोग आहे आणि मला पुढे ढकलणारा कावळा हे माझं आलार्मचं घड्याळ आहे. एकानं तर म्हटलं की मला या व्हिडीओचं अॅनिमेशन बनवायला आवडेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.