https://images.loksatta.com/2020/05/Corona-6-1.jpg?w=830
संग्रहित छायाचित्र

करोनाचा सामना करण्यासाठी पालिका रुग्णसेवा आता गतिमान!

आयसीयूतील खाटा दुप्पट, नियंत्रण कक्ष व डॅशबोर्ड प्रभावी होणार

by

संदीप आचार्य 
मुंबई: हॅलो कंट्रोल रुम, मी करोनाचा रुग्ण आहे. मला तापही आहे कृपया कोणत्या रुग्णालयात दाखल होऊ सांगा…. हॅलो, कंट्रोल रुम, मला करोना झालाय तातडीने रुग्णवाहिका पाठवा… एक ना दोन असे तब्बल चार हजाराहून अधिक दूरध्वनी रोज महापालिकेच्या १९१६ या नियंत्रण कक्षच्या क्रमांकावर येत असतात. यातील बहुतेकांना थेट आयसीयूत जागा हवी असते आणि मग सुरु होते ते पालिकेवर टीका…

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षनेे २६ जुलै २००५ ची पूरस्थिती सक्षमपणे हाताळली होती. तत्कालीन आयुक्त जॉनी जोसेफ जवळपास ३६ तास नियंत्रण कक्षमधून सतत परिस्थिचा आढावा घेऊन मदतीचे नियोजन करत होते. अख्खी मुंबई तेव्हा पाण्यात बुडाली होती. जवळपास १७ हजार शेळ्या व छोटी जनावरे आणि पंधारेहून अधिक गाई-म्हशी आदी मोठी जनावरे पाण्यात बुडून मरण पावली होती. त्यांची तातडीने व्यवस्था न केल्यास मुंबईत मोठी रोगराई पसरली असती. जॉनी जोसेफ यांनी तात्काळ ही व्यवस्था केली एवढेच नव्हे तर पाण्याखाली गेलेले हजारो घरसंसार सावरले.

महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षमुळेच तेव्हा मुंबईची परिस्थिती वेगाने सावरू शकली. आज मुंबईत वेगाने करोना परसरत असल्याने सारा भार आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. रुग्णसंख्या वाढत चालली आहे. रुग्णालये व रुग्णालयातील बेड अपुरे पडत आहेत. रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळण्यात अडचणी येत आहेत. करोनामुळे एरवी आपल्या कार्यालयत दिसणारे लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते बऱ्यापैकी गायब आहेत. एरवी गल्लीबोळातही दिसणाऱ्या सर्वपक्षीय रुग्णवाहिका अचानक गायब झाल्या आहेत. मात्र मुंबई महापालिकेची रुग्णालये, त्यातील डॉक्टर आणि पालिकेच्या नियंत्रण कक्षमधील लोक जीवाची बाजी लावून काम करत आहेत.

महापालिकेचे सहाय्यक पालिका आयुक्तांपासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सारीच मंडळी त्यांना नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करत असल्यानेच मुंबईत पाणीपुरवठा असो कचरा उचलण्याचे काम असो कोठेही तक्रारी होताना दिसत नाहीत असे सांगून अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, “करोनाचे रुग्ण एकीकडे वाढत असताना आम्ही रुग्णालयीन बेड तसेच अतिदक्षता विभागातील बेडची संख्याही वेगाने वाढवत आहोत. त्याचबरोबर नियंत्रण कक्षाकडे येणारे दूरध्वनी व रुग्णांना दाखल करण्यासाठी तयार केलेल्या डॅशबोर्डची सांगड घालून रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात खाट कशी मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे. आजघडीला मुंबई महापालिका व शासनाच्या रुग्णालयात मिळून सहा हजार खाटा उपलब्ध आहेत तर अतिदक्षता विभागात ६०५ खाटा आहेत. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी तसेच अन्य खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत बेडची माहिती कळवली तर त्यानुसार नियोजन करता येते. सुरुवातीला पालिका रुग्णालयात माहिती वेळेत देण्यात काही अडचणी आल्या मात्र आता त्या बऱ्यापैकी दूर करण्यात आल्या असून खासगी रुग्णालयातून रिअर टाईम माहिती मिळण्यात अजूनही काही अडचणी आहेत. सामान्यपणे दर दोन तासांनी रुग्णालयातून खाटांच्या परिस्थितीची माहिती डॅशबोर्डकडे आल्यास मुंबईतील रुग्णांना वेळेत योग्य रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल. आगामी दोन आठवड्यात आमच्याकडे जवळपास वीस हजार रुग्णालयीन खाटा उपलब्ध असतील यातील पन्नास टक्के ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था असेल तर पंधराशे खाटा या अतिदक्षता विभागात असतील त्यामुळे रुग्ण व्यवस्थापन परिणामकारकपणे करता येईल” असा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

मात्र वाढते रुग्ण लक्षात घेता हे एक आव्हान असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेकडे आजघडीला १०८ क्रमांकाच्या ६० रुग्णवाहिका आहेत तर अजून ९० रुग्णवाहिकांची लवकरच भर पडणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. याशिवाय २० खासगी तर १० अग्निशमनदलाच्या रुग्णवाहिका आहेत.काही बेस्ट व एसटीच्या बसेसचे रुपांतर रुग्णाहिकेत केल्यामुळे सुमारे ४५० रुग्णवाहिका आज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ३६ हर्श म्हणजे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेणाऱ्या गाड्या असून यातील काही करोनासाठी तर काही सामान्य मृत्यूसाठी वापरण्यात येतात. या साऱ्याचे नियोजन पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षमधून करण्यात येत असून यासाठी १९१६ वर दूरध्वनी करावा लागतो. १९१६ क्रमांक लावल्यावर १ नंबर दाबल्यावर रुग्णालयात दाखल करण्याबाबत डॉक्टरांशी बोलता येते. यासाठी नायर रुग्णालयात चार डॉक्टर चोवीस तास रुग्णांचे फोन घेऊन मार्गदर्शन करत असतात.

दोन क्रमांक दाबल्यास हर्श ची व्यवस्था केली जाते तर तीन क्रमांकावर गंभीर रुग्णांची माहिती घेऊन नियंत्रण कक्षच्या माध्यमातून रुग्णालयात व्यवस्था केली जाते. यासाठी पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षमध्ये तीन डॉक्टरांची व्यवस्था आहे. सामान्यपणे मुख्यालयातील नियंत्रण कक्षमध्ये ४७ कर्मचारी काम करतात. मात्र यातील बर्याच कर्मचार्यांना करोनाची लागण झाल्याने अवघ्या १६ कर्मचार्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्षचे काम सुरू असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या ३२ चालकांना करोनाची लागण झाल्याने तसेच या रुग्णवाहिकांवरील काही डॉक्टर आता काम करण्यास उत्सुक नसल्याने रुग्णवाहिकेचाही प्रश्न नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे.

याबाबत नियंत्रण कक्षचे प्रमुख महेश नार्वेकर यांना विचारले असता, “काहीजणांना करोना झाला असला तरी आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या कामावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगितले. तसेच काही माजी सुरक्षा अधिकारी घेऊन आम्ही आमचे काम अधिक गतीने करू असे त्यांनी सांगितले. रुग्णवाहिका नियोजनासाठी आम्ही उबरचा प्लॅटफॉर्म वापरणार असल्याने तसेच १०८ क्रमांकाच्या ९२ रुग्णवीहिका चालणार असल्याने आगामी काळात फारशी अडचण येणार नाही”, असे महेश नार्वेकर म्हणाले.

“महापालिकेने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक वॉर्डात आता १०० रुग्णालयीन खाटा व २० अतिदक्षता विभागातील खाटा असे नियोजन केले आहे. याशिवाय लवकरच खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा म्हणजे सुमारे चार हजार खाटा उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे त्यातील डॉक्टर व कर्मचारीही आम्हाला मिळतील”, असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे रुग्णालयीन खाटा व अतिदक्षता विभागातील खाटा वाढविल्या तरी त्यासाठी लागणारे प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांची उपलब्धता हा एक मुद्दा आहेच असे सांगून अश्विनी भिडे म्हणाल्या, “६० रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत तर ३५ टक्के रुग्णांना लक्षणे व थोडा ताप असतो तर पाच टक्के कोमॉर्बीडिटीच्या म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकारादी त्रास असलेल्या गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज लागते. आगामी दहा दिवसात या साऱ्यांची पुरेशी रुग्णालयीन व्यवस्था झाली असेल” असा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

प्रभावी नियंत्रण कक्ष तसेच डॅशबोर्ड व्यवस्थापन आणि पालिका व खाजगी रुग्णालयातील वाढत्या खाटा याच्या योग्य नियंत्रणाद्वारे आगामी काळात मुंबईतील वाढत्या करोनाचा प्रभावीपणे मुकाबला केला जाईल असे अश्विनी भिडे यांनी सांगितले. ज्या काही त्रुटी वा उणीवा आहेत त्याचाही आढावा घेण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे आमच्याकडे आता प्रत्येक वॉर्डमधील बारीक आकडेवारी उपलब्ध असल्याने तज्ज्ञ विश्लेषकांच्या माध्यमातून याचे विश्लेषणही केले जात आहे. तसेच गंभीर रुग्णांसाठीच्या प्रभावी औषध योजनेसाठी डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखालील कृती दलाशी प्रशासन समन्वय साधून असल्याचेही अतिरिक्त आयुक्त भिडे यांनी सांगितले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.