कंगनाचं पाली हिल येथील आलिशान ऑफिस; पाहा व्हिडीओ
हे ऑफिस बांधण्यासाठी कंगनाला आला तब्बल इतक्या कोटी रुपयांचा खर्च
by लोकसत्ता ऑनलाइनबॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगनाने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासोबतच तिने लेखन, दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. गेल्या वर्षी तिने स्वत:च्या निर्मिती संस्थेची स्थापना केली. ‘मणिकर्णिका फिल्म्स’ असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. मुंबईतील पाली हिल याठिकाणी तिचं प्रॉडक्शन हाऊस ऑफिस आहे. या ऑफिसचा व्हिडीओ नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सेलिब्रिटी डिझायनर शबनम गुप्ताने कंगनाच्या या ऑफिसचं इंटेरिअर डिझायनिंग केलं आहे. हे ऑफिस पूर्णपणे नव्याने बांधण्यात आलं आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाला त्यासाठी तब्बल ४८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. युरोपियन स्टाइलने या ऑफिसचं इंटेरिअर डिझाइन करण्यात आलं आहे. प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक इंटेरिअर असेल याची काळजी घेण्यात आली आहे.
“१० वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. कुठल्याही पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा लग्नांमध्ये न नाचता, कुठल्याही चिंधी ब्रँड्सच्या जाहिराती न करता कंगनाने हे यश संपादित केले.” अशा आशयाचे ट्विट करत कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिने ऑफिसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कंगनाचं हे नवं कार्यालय तिचा भाऊ अक्षित सांभाळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.