https://images.loksatta.com/2020/05/india-china-4.jpg?w=830

भारताचा निर्धार पक्का! सीमेवर काम थांबणार नाही, चीनची दादागिरी मोडणार

चीनची दादागिरी सहन करणार नाही, हे भारताने डोकलाम संघर्षाच्यावेळीच दाखवून दिले होते.

by

लडाखमधल्या वेगवेगळया भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य तैनात झाले असून दीर्घकाळ ही संघर्षाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर सीमा भागामध्ये सुरु असलेली विकास कामे कुठल्याही परिस्थितीत थांबवायची नाहीत, हा निर्धार करण्यात आला आहे. चीनची दादागिरी सहन करणार नाही, हे भारताने डोकलाम संघर्षाच्यावेळीच दाखवून दिले होते. त्यामुळे आता लडाखमध्येही दीर्घकाळ तणावाची स्थिती राहू शकते, त्यासाठी भारतही पूर्णपणे सज्ज आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

फॉरवर्ड पोझिशन्सवर दोन्ही बाजूच्या सैनिकांनी तंबू ठोकले असून तिथे अतिरिक्त सैन्य तुकडयांची कुमक, साहित्य अशी आवश्यक रसद पाठवण्यात आली आहे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. पण अजून कुठलाही तोडगा निघालेला नाही. भारताने आतापर्यंत फक्त एकदाच या संपूर्ण वादावर अधिकृत भाष्य़ केलं असून चीनला या संघर्षाच्या स्थितीसाठी जबाबदार धरले आहे.

काल रविवारी बिजींगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची पत्रकार परिषद झाली. पण यामध्ये त्यांनी एकदाही भारताचा उल्लेख केला नाही. लडाखच्या गालवान व्हॅली या भागामध्ये मोठा तणाव आहे. कारण इथे बांधकाम सुरु आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंत रस्ता बांधण्यात आला आहे. दौलत बेग ओल्डीमध्ये भारताने अत्याधुनिक धावपट्टी सुद्धा बनवली आहे. ही जगातील सर्वात उंचावरील धावपट्टी असून इथे इंडियन एअर फोर्सचे C-130 J विमान उतरु शकते. रणनितीक दृष्टीने भारतासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डी याच मार्गाने भारत काराकोरम हायवेपर्यंत पोहोचू शकतो. त्यावरच चीनचा आक्षेप आहे. . धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंतचा रस्ता २०१९ सालीच बांधून पूर्ण झाला आहे.

भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर

वर्चस्व गाजवण्याची चीनची जुनी खोड आहे. त्यामुळे सध्या लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

२०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधले आहेत.

घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत. २०१९ पासून चीनने दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये घुसखोरी सुरु केली. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.