…म्हणून गंभीरची कारकीर्द लवकर संपली – वेंगसरकर
गंभीर लवकर संघाबाहेर जाण्याचं 'हे' होतं कारण
by लोकसत्ता ऑनलाइनभारताचा डावखुरा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भारतीय संघाला टी २० विश्वचषक २००७ आणि वन डे विश्वचषक २०११ दोन्ही जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. टी २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ७५ धावा तर वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ९७ धावांची खेळी त्याने केली. गंभीरने भारताकडून ५८ कसोटी सामन्यात ४२ च्या सरासरीने ४,१५४ धावा केल्या. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्येदेखील त्याने दमदार कामगिरी केली. पण गंभीरला कारकिर्दीत अपेक्षित यश मिळू शकलं नाही, अशी भावना अनेकदा क्रिकेटरसिकांकडून व्यक्त करण्यात येते. याच संदर्भात माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना मत व्यक्त केले.
गंभीर २०१८ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला, पण त्याने शेवटचा टी २० सामना २०१२ मध्ये, शेवटचा वन डे सामना २०१३ मध्ये तर शेवटची कसोटी २०१६ मध्ये खेळली. याबद्दल बोलताना वेंगसरकर म्हणाले, “गंभीरला कायम त्याच्या क्षमतेपेक्षा कमी समजलं गेलं. त्याच्यात खूप प्रतिभा होती. पण मैदानावर खेळताना त्याला त्याच्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. त्याची क्षमता आणि खेळ पाहता तो भारतासाठी आणखी खूप जास्त क्रिकेट खेळू शकला असता”, असं टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना वेंगसरकर म्हणाले.
दिलीप वेंगसरकर
दोन दिवसांपूर्वी गंभीरने एका क्रिकेट चॅट शो मध्ये भारताचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांच्यावर संघ निवड प्रक्रियेवरून टीका केली होती. “कोणत्याही खेळाडूला संघातून वगळण्याआधी त्याला त्याची कल्पना द्यायला हवी. २०१६ मध्ये इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर मला संघातून वगळण्यात आले. तो निर्णय अचानक घेण्यात आला. पण मला त्याबाबत काहीही कल्पना देण्यात आली नव्हती”, अशी टीका गंभीरने केली होती. त्या संदर्भात वेंगसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
गौतम गंभीर
दरम्यान, ” जे माझ्या बाबतीत झालं, तेच युवराज, रैना, त्रिशतकवीर करूण नायर यांच्याबाबतीत घडलं. आमच्यापैकी कोणालाही विश्वासात घेऊन काहीही सांगितलं गेलं नाही. ज्या अंबती रायडूला सलग दोन वर्षे तुम्ही संघात चौथ्या क्रमांकासाठी खेळवले, त्याला विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर तुम्ही संघातून वगळले. आणि आम्हाला 3D खेळाडू हवा असं कारण देऊन त्याच्या जागी तुम्ही विजय शंकर ला संघात घेतलेत. विश्वचषक स्पर्धेच्या संघनिवडीबद्दल बोलताना कोणता निवड समिती अध्यक्ष असं करतो?”, असा रोखठोक सवाल गंभीरने प्रसाद यांना केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.