विराट संघाबाहेर; सर्वोत्तम ११ कसोटीपटूंमध्ये चार भारतीय
पाहा कोणत्या खेळाडूंची लागली वर्णी
by लोकसत्ता ऑनलाइनभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. जगातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची यादी तयार करायची झाली, तर त्यात विराटला कसोटी, वन डे आणि टी २० अशा तिन्ही संघात स्थान मिळेल. पण जर या संघाची निवड करणाची जबाबदारी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याच्यावर असेल, तर मात्र विराटची निवड कठीण आहे. ब्रॅड हॉगने नुकताच सर्वोत्तम ११ कसोटीपटूंचा संघ निवडला. त्या संघात त्याने सर्वाधिक चार भारतीय आणि चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश केला, पण विराटला मात्र संघात स्थान दिलं नाही.
मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा या दोघांना त्याने सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले. “फ्रंटफूटवर येऊन कव्हर ड्राइव्ह आणि पुल शॉट खेळण्यात मयंकचा हातखंडा आहे. रोहितने अधिकाधिक सामने भारतात खेळले आहेत. त्याची धावांची सरासरी ९० च्या वर आहे. मला त्याची खेळण्याची शैली आवडते, त्यामुळे मी या दोघांना संघात समाविष्ट केलं आहे, असं हॉग म्हणाला.” तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी त्याने ऑस्ट्रेलियन जोडी मानस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांची निवड केली.
पाचवा क्रमांक त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला दिला. तर सहाव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेची वर्णी लागली. सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार अजिबात पटत नसल्याचे सांगत त्याने अजिंक्य रहाणेला हा क्रमांक दिला. सातव्या क्रमांकावर त्याने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला पसंती दिली. त्यालाच त्याने संघाचा कर्णधारही केले.
गोलंदाजीची धुरा चार अनुभवी खेळाडूंवर त्याने सोपवली. फिरकीपटू म्हणून त्याने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला संघात घेतले. तर वेगवान गोलंदाजीसाठी त्याने ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, भारताचा मोहम्मद शमी आणि न्यूझीलंडचा नील वॅग्नर या तिघांना संघात स्थान दिले.
विराट का नाही?
“विराटला संघात न घेतल्याचं साऱ्यांना आश्चर्य वाटत असेल. सगळे त्यावरून प्रश्न विचारतील म्हणून मीच स्पष्टीकरण देतो. विराटच्या गेल्या १५ कसोटी डावांमधील धावा पाहा. त्यात केवळ चार वेळा त्याला ३१ पेक्षा अधिक धावा काढता आल्या आहेत. म्हणूनच या वर्षीच्या माझ्या कसोटी संघात विराटला संधी नाही”, असे त्याने स्पष्टपणे सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.