Cornavirus : चार भारतीय लस चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती
सध्या देशात १४ ठिकाणी लस शोधण्यावर काम सुरू आहे.
by लोकसत्ता ऑनलाइनदेशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनाचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात करोनाविरोधातील लस तयार करण्यावरही वैज्ञानिक दिवसरात्र काम करत आहेत. त्यातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात १४ ठिकाणी करोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी ४ लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. पाच महिन्यांच्या आत ४ लसींचं क्लिनिकल ट्रायल केलं जाऊ शकतं, असं हर्षवर्धन म्हणाले. चर्चेदरम्यान राव यांनी करोनाच्या लसीबद्दल त्यांना माहिती विचारली. “संपूर्ण जग करोनाची लस शोधण्याचे प्रयत्न करत आहे. १०० पेक्षा अधिक जण यावर काम करत आहेत आणि हे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांचं संयोजन करत आहे. भारतदेखील यावरील लस शोधण्यात सक्रीयरित्या काम करत आहे. भारतात १४ ठिकाणी यावर काम सुरू असून ते सध्या निरनिराळ्या टप्प्यात आहे,” असं ते म्हणाले.
“विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशातील १४ पैकी ठिकाणी सुरू असलेल्या लसींची येत्या चार ते पाच महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर आहेत,” असं हर्षवर्धन म्हणाले.
सध्या कोणत्याही लसीची अपेक्षा करणं ही घाई ठरू शकते असंही त्यांनी सांगितलं. लस विकसित करणं ही मोठी प्रक्रिया आहे. लस पूर्णपणे विकसित होण्यासाठी एखाद वर्ष लागू शकतं. यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात धुत राहणं, स्वच्छता राखणं हे त्यावरील उपाय असल्याचं ते म्हणाले. या आजारावर लस किंवा यावरील योग्य उपचार सापडत नाहीत तोवर हिच काळजी घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.