पालघर : ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी करोनाबाधित; रुग्णांना मनोर येथे हलवले
मनोर येथे काही काळ तणाव
by लोकसत्ता ऑनलाइनपालघर ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण विभागात काम करणाऱ्या एका तंत्रज्ञास करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालयात सील करण्यात आले असून याठिकाणी उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णाला मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे.
करोना बाधितांकरिता समर्पित उपचार केंद्र म्हणून कार्यरत असणाऱ्या पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण विभागात काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णालयाच्या अंतर्गत उपचार घेत असलेल्या इतर आजारांच्या रुग्णाला रविवारी सायंकाळी मनोर येथे हलवण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयातील सुमारे २० कर्मचाऱ्यांना पालघर पणेरी जवळील साईबाबा नगर येथील क्वारंटाइन कक्षामध्ये रात्री हलविण्यात आले असून त्यांच्या घशाच्या नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मनोर येथे काही काळ तणाव
पालघर येथील सर्व रुग्ण मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले असता तेथील ग्रामस्थांनी प्रथमता या कृतीस विरोध दर्शवला. या आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी सुविधांच्या मर्यादा असल्याने यापूर्वी अनेकदा ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. त्याचप्रमाणे उपचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा उपकरणे (पीपीई किट) उपलब्ध नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून उपचारासाठी सोई-सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.