Corona: अमेरिकेकडून पाकिस्तानला ४५ कोटींची आर्थिक मदत, एकूण १५९ कोटींची मदत करण्याची घोषणा
करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत जाहीर केली आहे
by लोकसत्ता ऑनलाइनकरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत जाहीर केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला ४५ कोटी ५८ लाख २० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे पाकिस्तानमधील राजदूत पॉल जोन्स यांनी व्हिडीओच्या माध्यमातून बोलताना सांगितलं आहे की, आर्थिक मदतीमुळे पाकिस्तानला आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात वाढ करत करोनाचा सामना करण्यास मदत मिळेल.
पॉल जोन्स यांनी आपल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानला ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच अमेरिकेला औषधांचा पुरवठा केल्याबद्दल पॉल जोन्स यांना पाकिस्तानचे आभार मानले असून हे दोन्ही देशांमधील मैत्री आणि संबंध दर्शवणारं असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान करोनाचा सामना करण्यासाठी मदत देणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश असून अमेरिका पाकिस्तानला एकूण १५९ कोटींची मदत करणार असल्याचं दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तानात करोना व्हायरस रुग्णांची संख्या ५२ हजाराहून जास्त झाली आहे. तर मृतांची संख्या १ हजार १०१ वर पोहोचली आहे. योग्य काळजी घेतली नाही तर पाकिस्तानात करोनाचा वेगाने प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.