हाँगकाँगमध्ये चीनविरोधात नागरिकांचं आंदोलन; पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
शुक्रवारी हाँगकाँगच्या संसदेत राष्ट्रीय सुरक्षा कायदा पारित करण्यात आला.
by लोकसत्ता ऑनलाइनचीनच्या वादग्रस्त राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविरोघात हाँगकाँगमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा माराही केला. तसंच काही नागरिकांना त्या ठिकाणाहून हटवण्यासाठी पोलिसांकडून पेपर स्प्रेचाही वापर केल्याची आल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाउन लागू झाल्यानंतर देशात होणारं हे पहिलं मोठं आदोलन आहे. दरम्यान, नागरिकांचा होणारा विरोध पाहून पोलिसांनी चीनच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची सुरक्षाही अधिक कडक केली आहे.
शुक्रवारी हाँगकाँगच्या संसदेत राष्ट्रीय सुरक्षा कायदा पारित करण्यात आला. हाँगकाँगवर आपलं नियंत्रण अधिक बळकट करणं हा या मागील चीनचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे. या कायद्याविरोधात रविवारी हजारोंच्या संख्येनं नागरिक काळे कपडे परिधान करून प्रमुख शॉपिंग सेंटर कॉजवे बेच्या बाहेर एकत्र जमले होते. त्यानंतर या नागरिकांनी या कायद्याविरोधात आंदोलन करण्यास सुरूवात केली होती.
यावेळी आंदोलकांनी हाँगकाँग स्वतंत्र करा, आमच्या काळातील क्रांती अशी घोषणाबाजी करत या कायद्याचा विरोध केला. या आंदोलनादरम्यान हाँगकाँगमधील परिचित कार्यकर्ते टेक टॅम ची यांना अटक करण्यात आली. तसंच यावेळी आठ लोकांपेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येण्याबाबत पोलिसांनी नागरिकांना सूचना केल्या. परंतु नागरिकांनी न ऐकल्यानं पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.
२८ मे रोजी कायदा पारित होण्याची शक्यता
चीनच्या संसदेत २८ मे रोजी हा कायदा पारित होण्याची शक्यता आहे. हा कायदा पारित झाल्यास सरकारला शहरात प्रमुख संस्थांना तैनात करण्याचे अधिकार मिळणार आहेत. तसंच चीनच्या एजन्ट्सना मनमानी कारभाराप्रमाणे लोकशाहीच्या समर्थकांना अटक करण्याची सुटही मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. हाँगकाँगचे अखेरचे ब्रिटिश गव्हर्नर क्रिस पॅटन यांनी चीननं आपली फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. “हाँगकाँगच्या नागरिकांसोबत चीननं विश्वासघात केला आहे. नवा कायदा आणून हाँगकाँगवर नियंत्रण आणण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचं दिसून आलं आहे. १९९७ मध्ये चीनसोबत करण्यात आलेल्या करारात हाँगकाँगची स्वतंत्र न्यायिक व्यवस्था असेल असंही त्यात नमूद करण्यात आलं होतं,” असं ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.