“ज्या ठिकाणी पोहोचायची तिकडेच ट्रेन पोहोचू द्या,” यादी मागणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना राऊतांचा टोला
गुरूवारी गोरखपुरला निघालेली ट्रेन ओडिशात पोहोचली होती.
by लोकसत्ता ऑनलाइनकरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा संकटकाळात हाती रोजगार नसल्यानं श्रमिकांनी पायी आपल्या गावची वाट धरली होती. परंतु रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपापल्या निर्धारित ठिकाणांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली आहे. गुरूवारी महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपुर या ठिकाणी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पीयूष गोयल यांना एकच विनंती आहे, की ट्रेन ज्या रेल्वे स्थानकावर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी. गोरखपुरसाठी सुटलेली ट्रेन ओडिशाला पोहोचू नये,” असं म्हणत राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना टोला लगावला.
काय आहे प्रकरण?
गुरूवारी महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपुर या ठिकाणी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली. दरम्यान यामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसंच काही लोकांनी याबाबत विचारणाही केली. तसंच रेल्वे आपला मार्ग सोडून दुसरीकडे गेली अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. परंतु त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. २१ मे रोजी महाराष्ट्रातील वसई रोड या स्थानकावरून सुटलेली वसई गोरखपुर ही ट्रेन कल्याण-भुसावळ-इटारसी-जबलपूर-माणिकपूर या मार्गांवरूनच धावणार होती. परंतु या ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला असून ती बिलासपूर, रसुगुडा, राउरकेला, आसनसोल या मार्गांवरून गोरखपुरला जाईल. विद्यमान मार्गावर कंजेशन असल्यानं या ट्रेनचा मार्ग वळवण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.