बीडमध्ये महिलेसह दोन मुलांची हत्या
आठवडय़ातील दुसरे तिहेरी हत्याकांड
by लोकसत्ता टीमआठवडय़ातील दुसरे तिहेरी हत्याकांड
बीड : करोना टाळेबंदीत, इतर गुन्हे कमी झाले असले तरी कौटुंबिक वादाच्या घटनांत वाढ झाल्याचे आठवडय़ातील दुसऱ्या घटनेने समोर आले आहे. शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. संगीता संतोष कोकणे ( वय ३१ ), संदेश संतोष कोकणे ( अंदाजे वय १०), मयूर संतोष कोकणे (वय ७ ) अशी मृतांची नावे आहेत.
बीड शहरात रविवारी दुपारी पेठ भागात तिघांचे मृतदेह आढळून आले. आई आणि मुलाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर मयूर या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला. खोलीत मृतदेहाजवळ घरातील साहित्य अस्ताव्यस्त झालेले होते. मोठा दगड आणि रक्त लागलेली क्रिकेटची बॅटही आढळून आली. दगड आणि बॅटने माय- लेकाचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. घरातील काही कपडेही रक्ताने माखले होते. घटनेची माहिती कळताच पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत , स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. या हत्याकांडाचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान आठवडय़ात जिल्ह्यतील तिहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना आहे. मांगवडगाव (ता.केज ) येथे शेत जमिनीच्या वादातून तिघांची हत्या झाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.