https://images.loksatta.com/2020/04/airline.jpg?w=830

टाळेबंदीआधी तिकीट घेणाऱ्या विमान प्रवाशांना भुर्दंड

केंद्राने मर्यादा घातल्याने फटका

by

केंद्राने मर्यादा घातल्याने फटका

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : टाळेबंदीमुळे आर्थिक फटका बसलेल्या विमान वाहतूक कंपन्यांकडून सेवा पूर्ववत करताना प्रवाशांची लूट होऊ नये म्हणून केंद्र सरकारने विमानाच्या प्रवास भाडय़ाची मर्यादा आखून दिली होती. मात्र या मर्यादेचा आर्थिक भुर्दंड टाळेबंदीपूर्वी तिकीट आरक्षित (अ‍ॅडव्हान्स बुकिंग) केलेल्या ग्राहकांना बसला आहे.

टाळेबंदीआधी विमानाचे तिकीट घेतलेल्या ग्राहकांना तिकीट रद्द करायचे असल्यास किंवा प्रवासाच्या तारखेत बदल करायचा असल्यास अधिक रक्कम मोजावी लागत आहे. शेकडो ग्राहकांनी मार्च आणि त्यापूर्वी  विमानाचे तिकीट खरेदी (पूर्व नोंदणी) करून ठेवले होते. टाळेबंदीमुळे त्यांना तिकीट रद्द करावयाचे असेल किंवा प्रवासाच्या तारखेत बदल करावयाचा असेल तर गो एअर एअरलाईन्स त्यावेळी खरेदी केलेल्या तिकिटाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम ग्राहकांकडून घेत आहे. त्यामुळे ग्राहकांना या तिकिटाचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे.

प्रवाशाची लूट होऊ नये म्हणून केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी किमान व कमाल भाडय़ांवर मर्यादा आणली आहे. मुंबई, दिल्ली व इतर महानगरांसाठी ९० ते १२० मिनिटे प्रवासासाठी लागतात. या गटातील प्रवासासाठी किमान ३५०० आणि कमाल १० हजार रुपये आकारले जात आहेत. कमाल भाडय़ाचे बंधन २४ ऑगस्टच्या मध्यरात्री ११.५९ मिनिटांपर्यंत लागू राहणार आहे.

केंद्राने विमान वाहतूक कंपन्यांच्या  मुसक्या आवळण्याकरिता प्रवासी भाडय़ासाठी  लादलेल्या मर्यादेचा फटका पूर्व नोंदणी करणाऱ्या विशेषत: सहल आयोजित करणाऱ्यांना बसला आहे.

नागपूरचे हरिहर पांडे यांनी टाळेबंदीपूर्वी अर्थात १७ मार्च २०२० रोजी नागपूर ते मुंबई प्रवासाकरिता ५० तिकिटांची पूर्व नोंदणी गो एअरकडे केली. हा प्रवास ३० जुलैसाठी होता. तेव्हा प्रत्येकी एका व्यक्तीच्या तिकिटासाठी त्यांनी २ हजार ६९५ याप्रमाणे एक लाख ३४ हजार ७५० रुपये भरले. मात्र त्यानंतर करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली आणि विमान प्रवासावर बंदी आली. अशात त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गो एअरकडे संपर्क साधला व तिकिटाची तारीख बदलण्याची विनंती केली. तशी तरतूद गो एअरच्या संकेतस्थळावर आहे. त्याप्रमाणे त्यांनी २९ डिसेंबर २०२० ही  सर्व ५० जणांच्या प्रवासासाठी तारीख कळवली. मात्र त्यासाठी कंपनीने आता जादा भाडे द्यावे लागेल असे त्यांना सांगितले. प्रत्येक एक तिकिटामागे अजून ३ हजार ७२५ रुपये वाढवले. त्यामुळे मूळ तिकिटाच्या किंमतीपेक्षा अधिकचे भाडे आकरण्यात येत असल्याचे बघता पांडे यांनी प्रवास रद्द करण्याचा विचार केला. तेव्हा त्यासाठी देखील मूळ तिकिटापेक्षा अधिकचे पसे द्यावे लागत आहेत. गो-एअरने यातून मार्ग काढायला हवा, असे हरिहर पांडे म्हणाले.

‘‘केंद्र सरकारने प्रवास भाडय़ाची किमान आणि कमाल मर्यादा ठरवून दिली आहे. त्याचे सर्व विमान वाहतूक कंपन्यांना पालन करायचे आहे. आमच्या हातात काही नाही.’’

– रत्नदीप सूर, महाव्यवस्थापक (इमरजन्सी रिस्पॉन्स मॅनेजमेंट पीआर, गो-एअर)

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.