मालेगावात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ६० टक्कय़ांनी घट
हापालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी या संदर्भात माहिती दिली.
by लोकसत्ता टीममालेगाव : करोना रुग्णांच्या वास्तव्याचे क्षेत्र दिवसागणिक वाढत गेल्याने शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ११९ पर्यंत गेली होती. परंतु, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार करण्यात आलेल्या पुनर्रचनेमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ६० टक्क्यांनी घटली असून आजच्या घडीला शहरात ४५ प्रतिबंधित क्षेत्रे राहिली आहेत. महापालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी या संदर्भात माहिती दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करोना बाधित रुग्ण आढळलेली स्थळे केंद्रबिंदू मानून तेथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. २२ मेपर्यंत शहरातील अशा क्षेत्रांची संख्या ११९ पर्यंत पोहचली होती. केंद्र शासनाच्या नवीन पुंज प्रतिबंधित क्षेत्रह्ण संकल्पनेनुसार त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ४५ पर्यंत आली आहे. ही पुनर्रचना करतांना पूर्वीचा भाग समाविष्ट किंवा समायोजितही करण्यात आला असल्याचे कापडणीस यांनी म्हटले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र पुनर्रचित करतांना तेथील लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाणे हद्दींचा विचार करून पोलीस आणि मनपा प्रभाग कार्यालयास संबंधित क्षेत्र सुलभ पद्धतीने कसे नियंत्रित करता येईल, याचा विचार करण्यात आलेला आहे. सर्वसाधारणपणे कोणतेही प्रतिबंधित क्षेत्र हे दोन वेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विभाजित होणार नाही आणि त्यामुळे अमलबजावणी करताना अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वीची १० प्रतिबंधित क्षेत्रे अप्रतिबंधित करण्यात आलेली आहेत.
प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रास किमान एक पोहोच रस्ता सामाईक असेल याची दक्षता घेण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त यंत्रमाग चालू करण्याचा निर्णय झालेला आहे. ही बाब लक्षात घेता नवीन प्रतिबंधित क्षेत्र तयार करतांना यंत्रमाग व्यवसायावर परिणाम होणार नाही याचाही विचार करण्यात आलेला आहे.
प्रतिबंधित क्षेत्राच्या उपरोक्त आदेशातून स्वच्छता सेवा, पाणीपुरवठा सेवा, आरोग्य सेवा, अग्निशमन सेवा, वीज वितरण सेवा, सर्व शासकीय आस्थापना, सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सेवा आणि सर्व औषध विक्री दुकाने यांना वगळण्यात आले असल्याचे कापडणीस यांनी नमूद केले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील कोणत्याही नागरिकाने पुढील १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्राच्या सिमा ओलांडून बाहेर पडू नये, रस्त्यावर रेंगाळू नये, फिरू नये आणि करोना संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.