टाळेबंदीचे दोन महिने : बदलले थोडे बाकी थिजलेले..
महाराष्ट्रासह राज्य सरकारांनी या काळात काहीवेळा स्वतंत्रपणेही टाळेबंदीला मुदतवाढ जाहीर केली.
by लोकसत्ता टीममुंबई : करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ विकाराचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने २४ मार्च रोजी देशभर टाळेबंदी जाहीर केली. त्याच्या पुढच्याच दिवसापासून, म्हणजे २५ मार्चपासून जवळपास १३० कोटी जनतेला घरांच्या, वस्त्यांच्या चौकटीत बंद करणारी ही जगातली सर्वात मोठी आणि काहींच्या मते सर्वाधिक निष्ठुर टाळेबंदी ठरली. सोमवारी म्हणजे २५ मे रोजी तिला दोन महिने पूर्ण होत आहेत. या काळात केंद्र सरकारच्या वतीने चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये टाळेबंदीच्या निमित्ताने नियमावली जारी करण्यात आली. महाराष्ट्रासह राज्य सरकारांनी या काळात काहीवेळा स्वतंत्रपणेही टाळेबंदीला मुदतवाढ जाहीर केली.
चौथ्या टाळेबंदीत देशात आणि राज्यात काही प्रमाणात सूट मिळालेली असली, तरी अजूनही शाळा-महाविद्यालये, सांस्कृतिक-धार्मिक-राजकीय कार्यक्रम व सोहळे, काही अपवाद वगळता सर्व प्रकारची विमान आणि रेल्वे वाहतूक यांच्यावर निर्बंध आहेत. दुसऱ्यांदा टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर, रोजगार बंद झालेल्या आणि दररोजच्या अन्नाला मोताद झालेल्या असंख्य असंघटित, स्थलांतरित कामगारांनी गावची वाट धरली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, दिल्ली, हरयाणासारख्या राज्यांतून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशासारख्या राज्यांमध्ये मोठय़ा संख्येने असे मजूर आजही जात आहेत. या मजुरांचे हाल, प्रवासात होणारे मृत्यू यांनी टाळेबंदीला स्वतंत्र व दुखद आयाम प्रदान केलेला आहे.
सारे काही बंद झाल्यामुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक महापेचावर उतारा म्हणून सरकारने २० लाख कोटींपेक्षा जरा अधिक मदतीची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत नामक या मदतयोजनेचे फलित मात्र काही काळानंतरच दिसू शकेल.
चार टप्पे, रुग्णसंख्या आणि बळी
पहिला टप्पा
२५ मार्च ते १४ एप्रिल २५ मार्च
’भारत (एकू ण रुग्ण – ५६२, मृत्यू- १३ )
’महाराष्ट्र (एकू ण रुग्ण – १२२, मृत्यू – ३)
दुसरा टप्पा
१५ एप्रिल ते ३ मे १५ एप्रिल
’भारत ( एकू ण रुग्ण – १२,३८०, मृत्यू – ४१४)
’महाराष्ट्र (एकू ण रुग्ण – २९१६, मृत्यू – १८७)
तिसरा टप्पा
४ मे ते १७ मे ४ मे
’भारत (एकू ण रुग्ण – ४२५३३, मृत्यू – १३७३)
’महाराष्ट्र (एकू ण रुग्ण – १२९७४, मृत्यू – ५४८)
चौथा टप्पा
१८ मे ते ३१ मे १८ मे
’भारत (एकू ण रुग्ण – १,०१,१३९, मृत्यू – ३१६३)
’महाराष्ट्र (एकूण रुग्ण – ३५०५८- मृत्यू – १२४९)
पंतप्रधान म्हणाले
टाळेबंदी १ : जान है तो जहाँ है. २१ दिवस टाळेबंदी केली नाही, तर २१ वर्षे मागे जाऊ.
टाळेबंदी २ : जान भी है, जहाँ भी है. संयम राखला, नियम पाळले तर करोनावर मात करू.
टाळेबंदी ३ : आपण मोठी आर्थिक किंमत मोजली. पण, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोणतीच किंमत मोठी नसते.
टाळेबंदी ४ : सुरक्षित राहिलेच पाहिजे, पण पुढे पुढे चालतही राहिले पाहिजे.
दोन महिने पूर्ण होताना..
१,३१,८६८ भारत
एकूण रुग्ण, (मृत्यू – ३८६७)
५०,२३१ महाराष्ट्र
एकूण रुग्ण, (मृत्यू – १६३५)
(आकडेवारी संदर्भ : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.