https://images.loksatta.com/2020/05/construction-workers.gif?w=830

बांधकाम व्यवसाय अडचणीत

स्थलांतरणामुळे अलिबागमध्ये कामगार नाके ओस

by

स्थलांतरणामुळे अलिबागमध्ये कामगार नाके ओस

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : अलिबाग शहरातील महेश टॉकीजजवळचा परिसर रोज सकाळी आठच्या कामगारांमुळे गजबजून जायचा. कामाच्या शोधात देशभरातील विविध भागातून आलेले मजूर या नाक्यावर दररोज हजेरी लावायचे. मजुरी ठरली की आपापल्या कामावर निघून जायचे. वर्षांतील बारा महिने हिच परिस्थिती कायम असायची. पण आज मात्र हा परिसर कामगारांअभावी ओस पडला आहे. करोनाची धास्ती आणि टाळेबंदीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. बहुतांश कामगार आपापल्या गावी परतले आहेत. याचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे.

औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे देशभरातील लाखो कामगार जिल्ह्यातील विविध भागात स्थिरावले होते. यात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओरीसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्यप्रदेशमधील कामागारांचा समावेश होता. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि देशभरात मार्च महिन्यात टाळेबंदी लागू झाली. रोजंदारीवर पोट असणाऱ्याा या मजुरांचा कोंडमारा सुरु झाला. आर्थिक विंवचनेने सर्वाना ग्रासले. अन्न धान्याची व्यवस्था होत होती. पण घराकडे परतण्याची ओढ आणि करोनाची धास्ती वाढतच गेली. त्यामुळे टाळेबंदी शिथिल होताच सर्वांनी आपापल्या गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातून ८४ हजार कामगार आपापल्या गावी परतले आहेत. या मजुरांसाठी बिहार, मध्यप्रदेश, ओरीसा, झारखंड येथे श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. काही जण मिळेल त्या वाहनाने आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत. याचे परिणाम आता दिसण्यास सुरूवात झाली आहे. कामगार नाके ओस पडले आहेत. जे कामगार राहिले आहेत, तेही गावाकडे परतण्याच्या मानसिकतेत आले आहेत.

कामगारांच्या या स्थलांतरणाचा सर्वाधिक परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. कामगारांअभावी बांधकामे बंद पडणार आहेत. कामगारांअभावी ही कामे पुन्हा सुरु करणे कठीण जाणार आहेत. जिल्ह्यात अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर परिसरात मोठय़ा प्रमाणात निवासी संकुले उभारण्याची कामे सुरु होती, पण आता ही कामे लवकर सुरु होतील अशी अपेक्षा नाही. कारण गावाकडे परतलेले कामगार पावसाळा संपल्याशिवाय पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे पुढील चार महिने ही बांधकामे सुरू होऊ शकणार नाहीत. अशी धास्ती बांधकाम व्यवसायिकांना वाटते आहे.

टाळेबंदीमुळे बांधकाम व्यवसायाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर आपापल्या राज्यात परत गेले आहेत. उर्वरीत कामगारांची थांबण्याची मानसिकता नाही. गावाकडे गेलेले हे कामगार परत येतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रासाठी हा काळ खडतर असेल. 

-शेखर वागळे, बांधकाम व्यावसायिक

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.