https://images.loksatta.com/2020/05/doctor-620x400.jpg?w=830

विलगीकरण केंद्रातील महिला डॉक्टरलाही करोना

नरेंद्रनगरसह इतरत्र ६ नवे रुग्ण

by

नरेंद्रनगरसह इतरत्र ६ नवे रुग्ण

नागपूर : आमदार निवास विलगीकरण केंद्रात कार्यरत एका महिला डॉक्टरलाही करोनाची बाधा झाली आहे. शहरात प्रथमच डॉक्टरला या विषाणूची बाधा झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या डॉक्टरसह शहरात ६ नवीन बाधित आढळल्याने नागपुरातील रुग्णसंख्या ४२६ वर पोहचली आहे. पैकी यशस्वी उपचाराने ३१३ जण करोनामुक्त झालेत.

नरेंद्रनगर येथील ४५ वर्षीय डॉक्टर आमदार निवास येथे विलगीकरण केंद्रात कार्यरत होती. वीस दिवसांपूर्वी ती सुट्टीवर गेली. मध्यंतरी तिची प्रकृती बिघडली. शनिवारी खबरदारी म्हणून ती आमदार निवासात स्वत: च्या घशातील द्रव्याचे नमुने चाचणीसाठी द्यायला गेली होती. हा अहवाल नकारात्मक आल्यावर पुन्हा रविवारपासून ती सेवा सुरू करणार होती. परंतु रविवारी पहाटे एम्सच्या प्रयोगशाळेत तिचा अहवाल सकारात्मक आला. तातडीने तिला एम्समध्ये उपचारासाठी दाखल करत तिच्या नरेंद्रनगर परिसरातील इमारतीत राहणाऱ्या कुटुंबीयांसह इतर सुमारे २० लोकांना महापालिका प्रशासनाने विलगीकरण केंद्रात हलवले. त्याचवेळी मेयोच्या प्रयोगशाळेत रविवारी मोमीनपुरा परिसरातील ५५ वर्षीय पुरुष आणि ४७ वर्षीय महिलेलाही विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. तर जवाहरनगरच्या २ आणि गड्डीगोदामच्या एकालाही करोना झाल्याचे चाचणी अहवालातून पुढे आले. सगळ्यांना रुग्णवाहिकेतून मेडिकल आणि मेयो रुग्णालयांत हलवण्यात आले. या बाधितांमुळे शहरातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ४२६ वर पोहचली आहे. शहरात प्रथमच नरेंद्रनगर परिसरात बाधित आढळल्याने येथील नागरिकांमध्ये आता चिंता वाढली आहे. नरेंद्रनगरची डॉक्टर सोडली तर इतर बहुतांश रुग्ण विलगीकरण केंद्रातील असल्याने संसर्गाचा धोका नसल्याचा आरोग्य खात्याचा दावा आहे.

डॉक्टरला कुणामुळे बाधा?

आमदार निवास येथील विलगीकरण केंद्रात कार्यरत असलेली डॉक्टर इमारत ‘सी’मध्ये कार्यरत होती. वीस दिवसांपूर्वी ती सुट्टीवर गेली होती. त्यापूर्वी सेवाकाळात ती आमदार निवासात नित्याने एन- ९५ मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई) घालण्यासह इतरही काळजी घेत असल्याचे तेथील डॉक्टर सांगतात. त्यामुळे तिला बाहेर कोणत्या बाधितांच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे.

‘त्या’ रुग्णाने डॉक्टरांचा त्रास वाढवला

मेयो रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आलेला नागपूर ग्रामीणमधील एक बाधित रुग्ण वारंवार रुग्णालयातून पळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे डॉक्टरांचा त्रास वाढला असून त्यांनी वार्डाच्या बाहेर सुरक्षा रक्षकांनाही तैनात केले आहे. दरम्यान या रुग्णाला करोनाचे गांभीर्य व त्यामुळे होणारे संभाव्य धोके सांगण्यात आले असून त्यचे तज्ज्ञ डॉक्टरांनी समुपदेशन केले आहे.

मेडिकलमध्ये सारीचे ३ रुग्ण दाखल

मेडिकलमध्ये सारीचे तीन नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यात ३६ वर्षीय तुकडोजीनगर येथील पुरुष, ५० वर्षीय बजेरिया येथील पुरुष आणि २८ वर्षीय पश्चिम बंगालच्या पुरुषाचा समावेश आहे. सगळ्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले गेले. दुसरीकडे मेडिकलमध्ये जुने सारीचे ६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे येथील सारीच्या रुग्णांची संख्या ९ वर पोहचली आहे.

दोन पोलिसांसह चौघे करोनामुक्त

दोन पोलीस कर्मचारी एक राज्य राखीव पोलीस दलातील जवान आणि मोमीनपुरा परिसरातील एक ५५ वर्षीय महिला अशा एकूण चार जण उपचाराअंती करोनामुक्त झाले. रविवारी त्यांना मेयो रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या सर्वाना पुढील चौदा दिवस गृह विलगिकरणात राहावे लागणार आहे.

नरेंद्रनगर परिसरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र

महापालिका हद्दीतील लक्ष्मीनगर अंतर्गत येणाऱ्या नरेंद्रनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ३५ या नव्या भागात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथील काही परिसर बंद करण्याचे आदेश महापालिकेने  दिले आहेत. नरेंद्रनगरातील वेणुवन सोसायटी परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे या कुटुंबासह परिसरातील १५ लोकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले. या भागातील सर्व मार्ग बंद करून या भागाची सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. याभागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राचे बाहेर जाण्यास व सदर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना क्षेत्रात येण्यास बंदी आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे यांना आदेशातून वगळले आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.